अधिकृत बिल मिळाल्याशिवाय बिलाचा भरणा करू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:36 AM2021-05-01T04:36:22+5:302021-05-01T04:36:22+5:30
फलटण : फलटण शहरात कोरोना रुग्णांवर उपचार करताना भरमसाट बिलाबाबत हॉस्पिटलकडून सुरू असलेल्या आकारणीबाबत आलेल्या तक्रारींची दखल घेत फलटण ...
फलटण : फलटण शहरात कोरोना रुग्णांवर उपचार करताना भरमसाट बिलाबाबत हॉस्पिटलकडून सुरू असलेल्या आकारणीबाबत आलेल्या तक्रारींची दखल घेत फलटण प्रांताधिकाऱ्यांनी शासकीय नियमानुसार प्रत्येक हॉस्पिटलने दरपत्रक लावावे व रुग्णांनी अधिकृत बिल मिळाल्याशिवाय बिलाचा भरणा करू नये,’ असे आवाहन प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी केले आहे.
सध्या फलटण शहरासह तालुक्यातील सर्वच भागामध्ये कोरोनाने धुमाकूळ घातलेला आहे. कोरोना काळामध्ये खासगी हॉस्पिटलमध्ये बऱ्यापैकी रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णांचे उपचार झाल्यानंतर हॉस्पिटलकडून अधिकृत बिल न देता शासनाच्या नियमापेक्षा जादा बिलाची आकारणी हॉस्पिटलकडून होत असल्याच्या तक्रारी वारंवार येत आहेत. म्हणूनच कोरोनाबाधित रुग्णांनी व त्यांच्या नातेवाइकांनी हॉस्पिटलकडून अधिकृत बिल मिळाल्याशिवाय बिलाचा भरणा करू नये व हॉस्पिटल प्रशासनानेही अधिकृत बिल न देता बिलाचा भरणा करून घेऊ नये, असे आदेश प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी दिले आहेत.
फलटण येथील निकोप हॉस्पिटल, सुविधा हॉस्पिटल, स्पंदन केअर हॉस्पिटल, श्री साई हॉस्पिटल, सिद्धनाथ हॉस्पिटल, जीवनज्योती हॉस्पिटल व सिद्धिविनायक हॉस्पिटलसह फलटण तालुक्यातील सर्व कोरोनावर उपचार करणाऱ्या हॉस्पिटलला शासन नियमानुसार सर्व हॉस्पिटलमध्ये कोरोना उपचाराबाबतचे दरपत्रक हे दर्शनी भागावर लावणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. दरपत्रक न लावल्यास कारवाई करणार असल्याचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी आदेशात नमूद केलेले आहे. प्रत्येक हॉस्पिटलने कोरोना रुग्णावर केलेल्या उपचाराबाबत बिलांची तक्रार आल्यास तपासणी करण्याबाबत नोडल ऑफिसर आणि ऑडिटर यांचीही नियुक्ती केल्याचे प्रांताधिकारी यांनी स्पष्ट केले.