भाषणं नको.. घोषणा हवी सातारकरांची अपेक्षा : सर्वच राजकीय पक्षांचे नेते आज एकाच व्यासपीठावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:59 AM2018-02-24T00:59:06+5:302018-02-24T00:59:06+5:30
सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित गौरव सोहळ्यासाठी राज्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना निमंत्रित केले आहे.
सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित गौरव सोहळ्यासाठी राज्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना निमंत्रित केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यासह मंत्री, नेते मंडळींची भाषणं ऐकण्यासाठी गर्दी होणार आहेत; त्याहीपेक्षा साताºयाच्या विकासासाठी कोणत्या घोषणा होतात? याकडे लक्ष असणार आहे.
खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्ताने शनिवारी गौरव सोहळा आयोजित केला आहे. यानिमित्ताने राज्यभरातील दिग्गज नेत्यांना निमंत्रण दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय कृषिमंत्री राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, पालकमंत्री विजय शिवतारे, सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री गिरीश महाजन, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, सहपालकमंत्री सदाभाऊ खोत, ‘रिपाइं’चे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह राज्यातील दिग्गज नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत.
वेगवेगळ्या पक्षांचे नेते एकाच व्यासपीठावर आल्यानंतर साहजिकच चिमटे काढणे, टोमणे मारणे आदी प्रकार भाषणातून होत असतात. एकमेकांवर चिखलफेक करणारे एका व्यासपीठावर आल्यावर काय बोलणार? हे सर्वसामान्यांसाठी उत्सुकतेचे असते. भाषणांपेक्षाही महत्त्वाच्या घोषणा होणे गरजेचे आहेत. त्याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागणार आहे.
साताºयातील वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न प्रलंबित आहे. मुख्यमंत्री सहा महिन्यांपूर्वी सातारा दौºयावर आले होते. तेव्हा एका महिन्यात प्रश्न सोडविण्याची ग्वाही त्यांनी दिली होती; पण पुढे काहीच झाले नाही. शनिवारच्या कार्यक्रमात ठोस उपाय काढण्याची गरज आहे.
साताºयाच्या हद्दवाढीचा प्रस्ताव शासन दरबारी १९९६ पासून धूळखात पडून आहे. त्यावर निर्णय झाल्यास त्रिशंकू भागातील नागरिकांच्या समस्या दूर होणार आहेत. वाढत्या शहरीकरणाबरोबरच कचराडेपोचीही मोठी समस्या आहे. सोनगाव कचरा डेपोतील कचरा जाळला जात असल्याने मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. त्यामुळे परिसरातील गावांमधील ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जमा होणाºया कचºयापासून खतनिर्मिती प्रकल्प उभारल्यास मोठा उद्योग उभारू शकतो. यासाठी मुख्यमंत्र्यांनी निधीची घोषणा करणे गरजेचे आहे.
सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात पासिंगसाठी येणाºया गाड्यांची चाचणी घेण्यासाठी जागाच उपलब्ध नाही. त्यामुळे त्या कºहाडला पाठवाव्या लागतात. यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
‘मॅग्नेटिक सातारा’ व्हावा
साताºयाची औद्योगिक वसाहत पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला आहे. मोठी जागा उपलब्ध आहे. अनेक उद्योगपतींनी जागा खरेदीही करून ठेवल्या आहेत; पण शिरवळ, खंडाळा, कºहाडच्या तुलनेत चांगले उद्योग आलेले नाही. त्यामुळे उद्योगजकांना आकर्षित करण्यासाठी ‘मॅग्नेटिक सातारा’साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठोस घोषणा करण्याची गरज आहे. यामुळे उद्योग उभारल्यास रोजगार निर्मितीही होणार आहे.
अजिंक्यताराच्या विकासासाठी हवाय निधी
सातारा जिल्ह्याला पर्यटनाचा वारसा लाभला आहे. वेगवेगळ्या भागातून आलेले पर्यटक हमखास अजिंक्यतारा किल्ल्यावर जातात. काही दिवसांपूर्वी सहलीसाठी आलेल्या गाडीला अपघात झाला होता. त्यामुळे रस्त्याचा प्रश्न समोर आला. तसेच किल्ल्यावर वीज नाही. अजिंक्यताराच्या विकासासाठी निधीची घोषणा होणे गरजेचे आहे.