मराठी भाषेच्या भवितव्याची चिंता नको : गंगावणे
By admin | Published: February 20, 2015 09:02 PM2015-02-20T21:02:05+5:302015-02-20T23:31:44+5:30
ग्रंथोत्सवास उत्साहात प्रारंभ : ग्रंथदिंडी, झांज पथकाने वेधले सर्वांचे लक्ष
सातारा : ‘पुस्तके आपल्याला जगायला शिकवतात. ग्रंथमहोत्सव तरुणांना प्रेरणा देणारे, राष्ट्राला दिशा देणारे महोत्सव आहेत. लेखकाला वाचकाच्या सद्भावनेचा गोडवा असतो, म्हणूनच मोठमोठी ग्रंथसंपदा तयार होते. मराठी भाषेची पालखी कराडो लोकांच्या खांद्यावर आहे म्हणून मराठी भाषेच्या भवितव्याची चिंता करण्याची गरज नाही,’ असेमत चित्रपट पटकथा लेखक, नाटककार प्रताप गंगावणे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, मराठी भाषा विभाग, जिल्हा माहिती कार्यालय सातारा आणि ग्रंथोत्सव २०१४ जिल्हा संयोजन समितीच्या संयुक्त विद्यमाने येथील छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल येथे आयोजित केलेल्या ग्रंथोत्सव २०१४ चे उद्घाटन शुक्रवारी (दि. २०) करण्यात आले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. अभिनव देशमुख, साहित्यिक डॉ. राजेंद्र माने, सातारा जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष संभाजीराव पाटणे, माहिती अधिकारी प्रशांत सातपुते
आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.जिल्हाधिकारी म्हणाले, ‘युवकांच्या बळावर भारत पुढील काळात महासत्ता होणार आहे, असे म्हटले जाते. परंतु त्यासाठी युवकांमध्ये विचारशील मन असण्याची गरज आहे. विचारशील मन निर्माण होण्यासाठी ग्रंथ वाचनाची सर्वाधिक आवश्यकता असून, विचारशील मनाच्या माध्यमातून कृतिशीलता कार्यान्वित केल्यास निश्चितच भारत महासत्ता होईल.’यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, डॉ. राजेंद्र माने यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात प्रशांत सातपुते यांनी ग्रंथोत्सवाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतापसिंह महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमात अनंत इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. अरुण जावळे यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापक शबनम मुजावर यांनी आभार मानले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, अधिकारी, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित
होते. (प्रतिनिधी)
ग्रंथदिंडीने प्रारंभ
ग्रंथोत्सवाची सुरुवात ग्रंथदिंडीने करण्यात आली. या ग्रंथ दिंंडीचा शुभारंभ अपर जिल्हाधिकारी प्रमोद यादव यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व ग्रंथदिंंडीतील पालखीमध्ये ठेवण्यात आलेल्या ग्रंथाचे पूजन करून करण्यात आला. ग्रंथदिंडी शाहू चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून सुरू होऊन त्यानंतर राजपथ मार्गाने प्रतापसिंह हायस्कूल येथे आली. ग्रंथदिंडीत शहरातील विविध
शाळांचे पाचशेहून अधिक विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी झाले होते. ग्रंथदिंडीत सहभागी झालेल्या लेझीम, ढोल-ताशांच्या पथकाने ग्रंथप्रेमींसह सर्वांचे लक्ष वेधून घेतले.