विकासाचे राजकारण करा, अन्यथा जशाच तसे उत्तर, आमदार शिवेंद्रसिंहराजेंचा विरोधकांवर हल्लाबोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2022 12:52 PM2022-01-04T12:52:00+5:302022-01-04T12:52:39+5:30
‘मी जावळी तालुक्यात आल्यामुळे काही जणांची राजकीय दुकानदारी बंद झाली. त्यामुळे त्यांचे पित्त खवळत आहे.
कुडाळ : ‘बोंडारवडी धरण प्रकल्प ५४ गावांसाठी महत्त्वाचा आहे. याबाबत विरोधकांनी जनतेच्या मनात माझ्याविषयी गैरसमज पसरवू नयेत, तालुक्यात विकासाचे राजकारण करावे, अन्यथा जशाच तसे उत्तर देण्यात येईल,’ असा हल्लाबोल आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला. आंबेघर येथे ज्ञानदेव रांजणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभीष्टचिंतन व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, जिल्हा परिषद सदस्या अर्चनाताई रांजणे, मेढ्याचे नगराध्यक्ष पांडुरंग जवळ, जावळी बँकेचे अध्यक्ष राजाराम ओंबळे, पंचायत समिती सदस्या अरुणा शिर्के, कांताबाई सुतार, विजय सुतार, जयदीप शिंदे, शिवाजीराव मर्ढेकर, दत्तात्रय पवार, विजयराव शेलार, कविता धनावडे, शांताराम पार्टे, माजी सभापती हणमंत पार्टे यांची उपस्थिती होती.
शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘मी जावळी तालुक्यात आल्यामुळे काही जणांची राजकीय दुकानदारी बंद झाली. त्यामुळे त्यांचे पित्त खवळत आहे. बोंडारवाडी धरणाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी हा प्रश्न ५४ गावांसाठी महत्त्वाचा आहे. शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी हे धरण झाले पाहिजे हीच माझी भूमिका आहे. या प्रकल्पाबाबत मी बंधारा बांधणार असे गैरसमज जनतेत पसरविले जात आहेत. जावळी बँकेचे कामकाज चांगले चालले असून यात कोणी राजकारण आणू नये. आगामी काळात नगरपंचायतीसह जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक ताकदीने लढविणार आहे.’
वसंतराव मानकुमरे म्हणाले, ‘शेतकऱ्यांसाठी प्रतापगड कारखान्यास आमदार भोसले यांनी मदत करावी. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत गनिमी कावा करून रांजणे यांनी यश मिळविले आहे. जावळीत शशिकांत शिंदेंचे एखादे दमदार काम दाखवा. यापुढे तालुक्यात गुंडगिरी व दहशत पसरविल्यास निश्चित उत्तर दिले जाईल.’
रांजणे म्हणाले, ‘तालुक्यातील जनतेने ही निवडणूक हातात घेऊन माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला विजयी केले आहे. जिल्हा बँकेची निवडणूक हे फक्त निमित्त होते. जावळी तालुक्यात येऊन दादागिरी करायची, लोकांची माथी भडकवायची असले प्रकार वाढू लागल्याने आमदार शिवेंद्रसिंहराजे व वसंतराव मानकुमरे यांच्यासह सर्वसामान्य जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. म्हणूनच मी ही लढाई जिंकू शकलो. शेवटच्या श्वासापर्यंत आमदार भोसले यांच्यासोबत काम करणार आहे. बोंडारवाडी धरणाच्या प्रश्नावरून विरोधक केवळ राजकारण करीत आहेत.’
कोरोनामध्ये प्रभावीपणे काम करणाऱ्या जयश्री शेलार यांच्यासह क्रीडा क्षेत्रात यश संपादन केलेल्या यश रांजणे, कादंबरी शेलार, अंगणवाडी सेविका, आशा, सरपंच, पत्रकार, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
रामभाऊ शेलार यांनी प्रास्ताविक, तर चंद्रकांत कोकाटे यांनी सूत्रसंचालन केले. सागर धनावडे यांनी आभार मानले.