आपापसातील भांडणे दूर ठेवून एकत्र काम करा
By admin | Published: July 2, 2016 11:53 PM2016-07-02T23:53:26+5:302016-07-02T23:53:26+5:30
रामराजे : राष्ट्रवादी तालुका मेळाव्यात ‘मिशन इलेक्शन’ची घोषणा
सातारा : ‘राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विचारांची पेरणी गावागावामध्ये झाली पाहिजे. आता सुरुवातीचा काळ राहिलेला नाही. सोशल मीडियाच्या जमान्यात तरुणांपर्यंत पवारांचे विचार पोहोचवून त्यांना प्रवाहात आणले पाहिजे. आगामी निवडणुका वेगळ्या आहेत. आत्तापर्यंत सत्तेत राहून निवडणुका जिंकल्या. आता पहिल्यांदाच सत्तेबाहेर राहून निवडणूक लढायची असून, जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद कायम ठेवण्यासाठी आळस झटकून, आपसातील भांडण विसरून कामाला लागावे,’ असा आदेश विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंंबाळकर यांनी दिला.
दरम्यान, ‘आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत सातारा तालुक्यात पुन्हा राष्ट्रवादीचीच सत्ता आणू,’ असा निर्धार आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी व्यक्त केला.
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी राष्ट्रवादीतर्फे आयोजित सातारा तालुका मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, पक्ष निरीक्षक सुरेश घुले, जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समिती सभापती सतीश चव्हाण, महिला व बाल कल्याण समिती सभपती वैशाली फडतरे, सदस्य राजू भोसले, जितेंद्र सावंत, किरण साबळे-पाटील, पंचायत समिती सभापती कविता चव्हाण आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
कोणतेही आव्हान नेस्तनाबूत
करू : शिवेंद्रसिंहराजे भोसले
‘पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार तालुकानिहाय मेळावे होत आहेत. सातारा जिल्हा आणि सातारा तालुका हा त्यांच्या विचाराने राष्ट्रवादीशी बांधला गेलेला आहे. दिवंगत भाऊसाहेब महाराजांनी सातारा तालुक्यात राष्ट्रवादी पक्ष उभा केला. राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता एकवटला की कोणतंही आव्हान आम्ही नेस्तनाबूूत करू, याची मला खात्री आहे,’ असे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी स्पष्ट केले.
सरकारबद्दल जनतेत प्रचंड चीड : शशिकांत शिंदे
‘माझ्या पहिल्या विजयात दिवंगत अभयसिंहराजे यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या पश्चात आ. शिवेंद्रसिंहराजे सातारा तालुक्याची धुरा तितक्याच ताकदीने सांभाळत आहेत. आपला बालेकिल्ला काल होता, आज आहे आणि कायम राहणार आहे. लोकांच्या मनात सरकारबद्दल चीड, नाराजी आहे. कट कारस्थाने करून सहकार मोडीत काढण्याचे प्रयत्न सरकारचे आहेत.’