भ्रष्टाचाराबाबत तुम्ही गप्प का?
By admin | Published: November 16, 2016 10:44 PM2016-11-16T22:44:05+5:302016-11-16T22:44:05+5:30
शिवेंद्रसिंहराजे भोसले : मनमानी कारभाराला विरोध केल्यानेच नगरसेवकांविरोधात आरोप
सातारा : सातारा पालिकेसाठी मनोमिलन व्हावे, अशी माझी इच्छा होती. एकत्रित निवडणूक लढविण्यासंदर्भात डी. जी. बनकर यांच्याशी चर्चा केली. लहान बंधू म्हणून, मी दोन वेळा खा. उदयनराजेंना फोन केला मात्र त्यांनी फोन घेतला नाही. मनोमिलन का तुटले याची मला माहिती नाही असा खुलासा आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान दहा वर्र्षांत माझ्या नगरसेवकांनी काय भ्रष्टाचार केला आहे, तो खुशाल जनतेसमोर मांडावा, असे जाहीर आव्हान खासदार उदयनराजे भोसले यांना दिले.
पालिका निवडणुकीच्या मनोमिलनासंदर्भात बोलताना आ. शिवेंद्रसिहराजे म्हणाले, ‘मनोमिलनासाठी माझ्याकडून कसलेही प्रयत्न कमी पडले नाहीत. निवडणूक एकत्रित लढण्याची माझी शेवटपर्यंत तयारी होती. मात्र दोन वेळा मी चर्चेसाठी गेलो; परंतु प्रतिसाद मिळाला नाही. दहा वर्षे मनोमिलन असताना सर्वच एकत्रित कारभार सुरू होता. मग आमच्या नगरसेवकांनी भ्रष्टाचार केला असे कसे म्हणता येईल. भ्रष्टाचार केला तर मग तुम्ही गप्प का बसला ? असा मुद्दा उपस्थित करून ते म्हणाले, फिश मार्केट उभारणीला आमच्या नगरसेवकांनी आडकाठी घेतली होती.
वेदांतिकाराजे म्हणाल्या, ‘दहशतमुक्त सातारा याचा अर्थ विरोधकांनी वेगळा घेतला आहे. सातारा एमआयडीसीमध्ये खंडणीचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे उद्योजकांना त्याचा त्रास होत आहे. खंडणी मागणारे कोण आहेत याचे आत्मपरीक्षण विरोधकांनी करावे. रेमंण्ड सारखी मोठी कंपनी साताऱ्यात येणार होती. मात्र खंडणीच्या प्रकारांमुळे आली नाही. माझा स्वभाव ‘कडक’ आहे असा अप्रचार सुरू आहे. असे असते तर मी २५ वर्षे संसार केला असता का? मी ‘कर्तबगार’ आहे याची धास्ती विरोधकांनी घेतली असे वाटत आहे असे स्पष्ट करून वेदांतिकाराजे म्हणाल्या, सातारकरांना ‘कर्तबगार’ नगराध्यक्ष नको आहे का? असा सवाल करून मी नगराध्यक्ष झाले पालिकेत बसून काम न करता पाच वर्षात प्रत्येक प्रभागात फिरून नागरीकांचे प्रश्न जाणून घेवून काम करणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
प्रचाराला आमचे नगरसेवक कसे चालतात?
फिश मार्केट आहे तेथेच मार्केट उभारण्यात यावे अशी आमची मागणी होती. अशा अनेक मनमानी कामांच्या आड आमचे नगरसेवक येत होते. ते त्यांना खटकत होते. निवडणुका आल्या की, आमच्या नगरसेवकांचा भ्रष्टाचार बाहेर काढतो असे म्हणने चुकीचे आहे. त्याच भ्रष्टाचार करणाऱ्या नगरसेवकांनी तुमच्या खासदारकीच्या निवडणुकीत प्रचार केलेला कसा चालतो. आमच्या नगरसेवकांनी केलेला भ्रष्टाचारावर त्यांनी बोलावे, आम्हाला काही फरक पडत नाही. त्यांच्या मनमानी कारभाराच्या आड आमचे चार, पाच नगरसेवक येत होते ही त्यांना मोठी अडचण होती, असेही शिवेंद्रसिंहराजेंनी स्पष्ट केले.