अन्न शिजवून नव्हे तर भिजवून खायचं का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:41 AM2021-08-22T04:41:34+5:302021-08-22T04:41:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वडूज : पेट्रोल, डिझेल, घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती सातत्याने वाढत असल्याने या महागाईमुळे सामान्यांचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वडूज : पेट्रोल, डिझेल, घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती सातत्याने वाढत असल्याने या महागाईमुळे सामान्यांचे कंबरडे मोडले असून, जगणे अवघड झाले आहे. त्यातच सध्या घरगुती गॅस सिलिंडर महाग झाल्यामुळे एका सिलिंडरला ८६८ रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे नागरिकांची आर्थिक कोंडी होऊन जगणे मुश्कील झाले आहे. स्वयंपाकाचा सिलिंडर पुन्हा महागल्याने अन्न शिजवून खायचे की भिजवून खायचे, हा यक्ष प्रश्न उभा ठाकला आहे.
कोरोना महामारीच्या काळात नोकरी व उत्पन्नात घट झाल्याने बहुतांश नागरिक कमी उत्पन्नात कुटुंबाचा खर्च चालवत आहेत. या काळात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी करण्याऐवजी सरकार दरवाढ करत असल्याने नागरिक सरकारला दोष देत आहेत. विविध ग्राहक संघटनांसह महागाई कमी करण्याची मागणी सर्वस्तरातून होऊ लागली आहे. रॉकेल, जळण व चूल हे बंद अवस्थेत असल्याने घरगुती गॅस हा रोज लागणाऱ्या गोष्टींपैकी एक असल्यामुळे तो खरेदी करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. केंद्र सरकार स्वयंपाकघरातील वस्तूंच्या दरात वाढ करत असल्याने महिन्याचे बजेट कोलमडले आहे. दुसरीकडे खाद्यतेलासह अन्य जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ सुरूच आहे.
सबसिडी बंद व दरवाढ सुरूच राहिल्याने छोटे-मोठे व्यावसायिक व मध्यमवर्गीय लोकांचे अतोनात हाल होत आहेत. सरकारच्या करामुळे गॅस सिलिंडरच्या दरात अतोनात वाढ झाली आहे. गत दीड वर्षापासून केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरवरील अनुदान थांबविल्याचे दिसून येत आहे. सिलिंडरचे दर आणि प्राईस रेटमधील फरक म्हणजे अनुदान होय. हे अनुदान ग्राहकांच्या खात्यात जमा व्हायचे. दीड वर्षात सिलिंडरच्या किमतीत सतत चढता आलेख वाढल्यानंतर ग्राहकांना अनुदान मिळाले नाही. सबसिडी नावालाच राहिल्याने सध्या स्वयंपाकघरात आर्थिक कोंडी होऊ लागली आहे.
___
चौकट :
आठ महिन्यांत १६६ रुपयांची वाढ...
जानेवारी - ७०२ रुपये, फेबुवारी - ७०२, मार्च - ८२७, एप्रिल - ८१७, मे - ८१७, जून - ८१७, जुलै - ८४२ ऑगस्ट - ८६७
----
प्रतिक्रिया -
कोरोनामुळे नोकरदारांचे पगार कमी झाले असताना दिवसेंदिवस गॅसचे दर वाढत आहेत. दर महिन्याला सिलिडंरचे दर वाढवून सरकार सर्वसामान्य कुटुंबांवर अनावश्यक भार टाकत आहे. सध्या बाजारपेठांमध्ये सर्वच वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे स्वयंपाक घराचे नियोजन ही आम्हा गृहिणींसाठी तारेवरची कसरत झाली आहे.
- मीनल काटकर, गृहिणी
....
प्रतिक्रिया
किराणा खाद्यतेल आणि अन्य वस्तूंचे भाव वाढले आहेत. दुसरीकडे उत्पन्न कमी झाले असून, महिन्याचा घरखर्च कसा भागवायचा याची चिंता आहे. शहरात चूलही पेटविणे शक्य नाही. त्यामुळे कोणत्याही वस्तूंचे दर वाढवताना सरकारने गरीब व सामान्यांचा विचार करावा.
- नगिना मुल्ला, गृहिणी
संग्रहित चूल, सिलिंडरचा फोटो वापरणे