रेल्वे परीक्षा द्यायची की एमपीएससीची?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:40 AM2021-03-17T04:40:33+5:302021-03-17T04:40:33+5:30
सातारा : कोविड काळात पुढं गेलेल्या स्पर्धा परीक्षांमागचे विघ्न अद्यापही दूर होण्याची लक्षण दिसत नाहीत. पुढे गेलेली एमपीएससी परीक्षा ...
सातारा : कोविड काळात पुढं गेलेल्या स्पर्धा परीक्षांमागचे विघ्न अद्यापही दूर होण्याची लक्षण दिसत नाहीत. पुढे गेलेली एमपीएससी परीक्षा २१ तारखेला घ्यायचा शासनाने निर्णय दिला. मात्र, याच दिवशी रेल्वेची परीक्षा असल्याचे समोर आले आहे. परिणामी काही विद्यार्थ्यांना यातील एका परीक्षेला मुकावं लागणार आहे.
दरम्यान, सातारा जिल्ह्यातील सुमारे ७० टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांनी रेल्वेची परीक्षा यापूर्वी दिली आहे. मात्र, उरलेल्यांसाही या दोन्हीही परीक्षा महत्त्वाच्याच आहेत. काही विद्यार्थ्यांना एमपीएससीच्या परीक्षेचा अनुभव घ्यायचा आहे, त्यांच्या मते ही परीक्षा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण होणं शक्य नसलं तरीही त्याचा अनुभव घेणं महत्त्वाचं आहे. ज्यांनी यापूर्वी रेल्वेची परीक्षा दिली आहे, त्यांनी मात्र एमपीएससीच्या परीक्षांची जय्यत तयारी सुरू केली आहे.
एकाच दिवशी दोन्ही परीक्षा आल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर दाखल होण्यासाठीही कसरत करावी लागणार आहे. अभ्यासक्रमांतही काही बदल असल्यामुळे एकाच दिवशी दोन्ही परीक्षा देणं दिव्य ठरणार असल्याचं विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
पॉर्इंटर
दोन्ही परीक्षा : २१ मार्च
एमपीएससीसाठी विद्यार्थी : १८ हजार
परीक्षा केंद्रे :
रेल्वेची परीक्षा टप्प्यानेच
यंदा रेल्वेने तब्बल ३२ हजार २०८ जागांसाठी परीक्षा जाहीर केली आहे. कोरोनाची परिस्थिती पाहता या परीक्षा टप्प्याटप्याने घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश विद्यार्थ्यांनी यापूर्वीच ही परीक्षा दिल्याने त्यांना केवळ एमपीएसएसीचीच परीक्षा द्यावी लागणार आहे.
केंद्रावर पोहोचण्यासाठी कसरत
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील सेंटरमध्येच परीक्षा देण्याचा पर्याय निवडला आहे. मात्र, एकाच दिवशी दोन दोन परीक्षा असल्याने दोन्ही केंद्रांवर पोहोचण्यासाठीची कसरत विद्यार्थ्यांना मानसिक ताण देण्याचीही शक्यता आहे.
कोट
एमपीएससी आणि रेल्वे या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्याने काहींना एक परीक्षेला मुकावं लागणार आहे. रेल्वेने टप्प्याने परीक्षा घेतल्याने अनेकांनी यापूर्वीच ही परीक्षा दिली आहे.
- मयूरी निपाणे, महादरे
मला एमपीएससीमध्ये यश मिळेल अशी खात्री नाही, पण या परीक्षेचा अनुभव घेण्यासाठी मी प्रयत्न करतोय तर रेल्वे परीक्षा उत्तीर्ण होईन असा विश्वास आहे. आता दोन्हीपैकी काय निवडावं हा प्रश्नच आहे.
- अनय चव्हाण, दहिवडी