साताऱ्यात डॉक्टरची ओपीडीतच गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:34 AM2021-01-17T04:34:12+5:302021-01-17T04:34:12+5:30
सातारा : येथील संभाजीनगरमधील एका डॉक्टरने राहत्या घरात असणाऱ्या ओपीडीतच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी दुपारी ...
सातारा : येथील संभाजीनगरमधील एका डॉक्टरने राहत्या घरात असणाऱ्या ओपीडीतच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
दिगंबर रघुनाथ पवार (वय ५६), असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव असून, सातारा शहर पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे. दरम्यान, या घटनेनंतर वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. डॉक्टरांच्या आत्महत्येचे कारण पोलिसांना समजू शकले नाही.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिगंबर पवार आणि दीपाली पवार (वय ५२, रा. खंडोबाचा माळ, संभाजीनगर, सातारा) हे डॉक्टर दाम्पत्य आहे. डॉ. दिगंबर पवार यांनी शुक्रवार, दि. १५ रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास राहत्या घरी ओपीडीमध्ये स्लॅबच्या हुकाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती त्यांची पत्नी डॉक्टर दीपाली पवार यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चिठ्ठी अथवा काही संशयास्पद सापडतेय का, हे तपासले; परंतु घरात पोलिसांना काहीही सापडले नाही. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येचे गूढ कायम आहे.