धक्कादायक! वृद्धाच्या पोटात चक्क जिवंत २० गोगलगाई; वैद्यकीय क्षेत्रात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2019 10:26 PM2019-10-13T22:26:32+5:302019-10-13T22:28:21+5:30
दूषित पाण्यातून पोटात गेली अंडी
सातारा : सातारा तालुक्यातील करंडी येथील जगन्नाथ महादेव जाधव या ८० वर्षीय वयोवृद्धाच्या पोटात चक्क दूषित पाण्याद्वारे अंडी गेल्याने तब्बल २० हून अधिक जिवंत गोगलगाई त्यांच्या पोटात आढळल्या. या अजब घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
जगन्नाथ जाधव यांना काही दिवसांपासून जुलाबाचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांना साताऱ्यातील डॉ. विक्रांत महाजनी यांच्या समर्थ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या शौचाद्वारे गोगलगाई बाहेर आली. त्यांनी हा प्रकार डॉक्टरांना सांगितला. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांची सोनोग्राफी केली असता, त्यांच्या पोटामध्ये वीसहून अधिक जीवंत गोगलगाई असल्याचे निष्पन्न झाले. आश्चर्य म्हणजे या वयोवृद्धाच्या पोटातील गोगलगाई विना शस्त्रक्रियाद्वारे बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले. मात्र, दुर्दैवाने त्यांच्या पोटामध्ये गोगलगाईचे विष पसरल्याने त्यांच्या दोन्ही किडण्या निकामी झाल्या आहेत. याला वैद्यकीय क्षेत्रात ‘इंटरस्ट्रीशियल नेफ्रिटीस’असे म्हटले जाते. त्यामुळे जाधव यांना डायलेसिस करावे लागत आहे. त्यांना पुढील उपचारासाठी कऱ्हाडमधील कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे हॉस्पिटल प्रशासनाने सांगितले.
मुसळधार पावसात गावात दूषित पाणी पुरवठा होत होता. या परिसरातील अनेकांना गॅस्ट्रोची लागणही झाली होती. त्यातच ही घटना समोर येताच ग्रामपंचायत प्रशासनाने दखल घेत पाणी पुरवठा करणारी टाकी, पाईपलाईन गळती व गावात स्वच्छता केली आहे. दूषित पाणीपुरवठा होत असल्याने पाणी उकळून पिण्याच्या सूचना ग्रामस्थांना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.