सुसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रतीक्षा डॉक्टर अन् कर्मचाऱ्यांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:44 AM2021-08-13T04:44:29+5:302021-08-13T04:44:29+5:30

वाठार निंबाळकर : गेल्या तीन वर्षांपासून बांधकाम पूर्ण होऊन ताथवडे येथील नव्याने बांधलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत डॉक्टर, आरोग्य ...

Doctors and staff waiting for a well-equipped primary health center | सुसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रतीक्षा डॉक्टर अन् कर्मचाऱ्यांची

सुसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रतीक्षा डॉक्टर अन् कर्मचाऱ्यांची

Next

वाठार निंबाळकर : गेल्या तीन वर्षांपासून बांधकाम पूर्ण होऊन ताथवडे येथील नव्याने बांधलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रतीक्षेत आहेत. डॉक्टर नसल्याने आरोग्य केंद्राअंतर्गत समाविष्ट २० गावांतील ग्रामस्थांची कोरोना काळात ससेहोलपट सुरू आहे.

याबाबत माहिती अशी की, फलटण तालुक्यातील ताथवडे येथे नव्याने मंजूर झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत आरोग्य सेवेसाठी तीन वर्षांपासून सज्ज आहे. अद्याप वैद्यकीय अधिकारीच नसल्याने ग्रामस्थांना दवाखान्याचा वापर करून उपचार घेता येत नाहीत. ताथवडा येथे जानेवारी २०१३ मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर केले होते. संतोष गड डोंगराच्या पायथ्याला भव्य इमारत उभारण्यात आली. या आरोग्य केंद्र अंतर्गत ताथवडे, तरडफ, दालवडी, ढवळ, वाठार निंबाळकर ही उपकेंद्रे समाविष्ट केली आहेत, तर ताथवडे, झडकबाईचीवाडी, मानेवाडी, पिराचीचीवाडी, ढवळ, वाखरी, शेरेचीवाडी, तरडफ, उपळवे, वेळोशी, दालवडी, जाधवनगर, सावंतवाडी, दऱ्याचीवाडी, वाठार निंबाळकर, गोळेवाडी, मिरेवाडी, गोळेवाडी, जोरगाव, खडकी ही वीस गावे समाविष्ट केली आहेत.

ताथवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामुळे २०११ च्या जनगणनेनुसार ढवळ, दालवडी, वाठार निंबाळकर, ताथवडे उपकेंद्रांतील ग्रामस्थांना आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे. ताथवडे प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रात २४ हजार ६१२ लोकसंख्येचा समावेश होतो. ताथवडे घाटात वारंवार अपघात घडत असतात. जखमी वाहनचालक तसेच वन्यजीव प्राण्यांच्या हल्ल्यात जखमींना तातडीची मदत मिळणार आहे.

ताथवडेत शासनाने अद्ययावत दवाखान्याची इमारत बांधली आहे. मात्र, प्रत्यक्षात दवाखाना सुरू झाला नाही. तो लवकर सुरू होऊन आमच्या गावासह इतर गावांतील सर्वसामान्य ग्रामस्थांना उपचार मिळावेत.

- अरविंद जाधव

सामाजिक कार्यकर्ता, ताथवडा

ताथवडा उपकेंद्रातील समाविष्ट गावांतील ग्रामस्थांना सर्दी, खोकला, उलट्या-जुलाबासारखे किरकोळ आजारासाठी ही आर्थिक परिस्थिती नसतानाही फलटणला जावे लागते. येथील शासकीय दवाखाना सुरू झाल्यास तातडीची उपचार व आरोग्य सेवा मोफत उपलब्ध होईल, असा विश्वास पिराचीवाडीचे सरपंच दीपकराव सावंत यांनी व्यक्त केला.

शासनस्तरावर पाठपुरावा सुरू

ताथवडे आरोग्य केंद्रात डॉक्टर, इतर आरोग्य कर्मचारी तसेच वैद्यकीय साहित्य मिळण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. लवकरच या ठिकाणी आरोग्य सेवा दिली जाईल, अशी ग्वाही फलटण तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रांत पोटे यांनी दिली.

Web Title: Doctors and staff waiting for a well-equipped primary health center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.