डॉक्टरची हुशारी ग्रामस्थांच्या अंगलट

By admin | Published: February 15, 2015 08:52 PM2015-02-15T20:52:45+5:302015-02-15T23:43:29+5:30

वैद्यकीय कचरा रस्त्यावर : तारुखमध्ये ग्रामस्थांसह पाळीव जनावरांच्या जीवितास धोका, फुटलेल्या बाटल्या, इंजेक्शनच्या सुयांचा खच

Doctor's cleverness | डॉक्टरची हुशारी ग्रामस्थांच्या अंगलट

डॉक्टरची हुशारी ग्रामस्थांच्या अंगलट

Next

कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील तारुख येथील के. टी. बंधारा परिसरातील स्मशानभूमी शेजारी रहदारीच्या रस्त्यावर वैद्यकीय कचरा टाकण्यात आला आहे. सज्ञान डॉक्टरांच्या या अज्ञान कृत्यामुळे ग्रामस्थांसह पाळीव जनावरांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. ‘स्वच्छ भारत’ अभियान सर्वत्र राबविले जात आहे. ग्रामीण भागात ग्रामस्वच्छता अभियानांसारखे उपक्रम राबवून गावोगावी स्वच्छतेबाबत जनजागृती मोहीम जोमाने सुरू आहे. या मोहिमेसाठी शासनाकडून लाखो रुपये खर्च केले जात आहेत. याचा परिणाम हळूहळू ग्रामीण भागातील लोकांमध्येही दिसून येऊ लागला आहे. मात्र सुशिक्षित लोकांकडूनच स्वच्छतेबाबत जागरूकता का दाखविली जात नाही, हा गंभीर प्रश्न आहे. तारुख येथे स्मशानभूमीशेजारी ग्रामस्थांसह पाळीव जनावरांच्या रहदारीच्या रस्त्यावर एका डॉक्टरने वैद्यकीय कचरा टाकला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना या वाटेवरून येणे जाणे धोक्याचे झाले आहे. शेजारीच ओढा असल्याने पाणी पिण्यासाठी या वाटेवरून जनावरांचा नेहमीचा राबता आहे. परिणामी फुटलेल्या बाटल्यांच्या काचा व निडलमुळे ग्रामस्थांसह जनावरांना इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (वार्ताहर)

निडल, सिरिंज, ब्लड बॉटल, बॅन्डेज, कॉटन, ड्रेसिंग मटेरियल आदी साहित्य वापरानंतर बायोमेडिकल वेस्टला नष्ट करण्यासाठी दिले जाते. वैद्यकीय वापरानंतरचे साहित्य नष्ट करण्यासाठी संबंधित डॉक्टरांना बायोमेडिकल वेस्टचे परवानगी पत्र असणे बंधनकारक असते. त्याचे प्रतिवर्षी नूतनीकरणही करावे लागते. वापरात आलेली निडल काही तासांच्या आत एखाद्या व्यक्तीस लागल्यास संबंधित व्यक्तीच्या आजाराचा त्या व्यक्तीला संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


लहान मुलांच्या जिवाशी खेळ
सिरिंजचा लहान मुलांकडून खेळण्यासाठी, पाणी उडविण्यासाठी उपयोग केला जातो. अशा सिरिंज मिळविण्यासाठी काहीवेळा मुले धडपडतानाही दिसतात. मात्र, तारुख येथे उघड्यावरच सिरिंज पडल्याने त्याची लहान मुलांना भुरळ पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सिरिंज लहान मुलांच्या हाती लागल्या तर मोठी इजा होण्याची भीती आहे.

डॉक्टर रंगेहाथ सापडण्याची प्रतीक्षा
वैद्यकीय वापरानंतर काचेच्या बाटल्या, निडल, सिरिंज, कॉटन, ड्रेसिंग मटेरियल या परिसरात वारंवार टाकले जाते. हा प्रकार कोणत्या डॉक्टरकडून केला जातो, याची पुसटशी कल्पना ग्रामस्थांना आहे. मात्र, संबंधित डॉक्टर कचरा टाकताना रंगेहाथ सापडत नसल्याने ग्रामस्थही हतबल झाले आहे.

योग्य विल्हेवाट
लावणे गरजेचे
वापर केलेल्या निडल ‘इलेक्ट्रिक बर्नर’द्वारे जाळल्या जातात. एखाद्या डॉक्टरकडे निडल बर्नर मशीन नसल्यास निडल हायड्रोक्लोराईड केमिकलमध्ये टाकून नंतर बायोमेडिकल वेस्टला नष्ट करण्यासाठी द्याव्या लागतात. मात्र, संबंधित डॉक्टर तसे न करता निडल उघड्यावरच टाकून देत आहे.

Web Title: Doctor's cleverness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.