वाईतील डॉक्टर जिल्हा रुग्णालयात सेवेसाठी दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 04:57 PM2020-04-18T16:57:16+5:302020-04-18T16:59:52+5:30
या नव्या रुग्णालयाची घडी बसण्यापूर्वी जगाला भीती दाखवणाºया विषाणू संसर्गजन्य कोरोना या आजाराने ग्रासले. आपले बांधव, आपल्यावर विश्वास असलेल्या रुग्णांची सेवा करण्यासाठी आपण जायला हवं, असं डॉक्टरांना वाटलं, तसा त्यांनी शासनाकडे अर्ज सादर केला आणि
वाई : कोरोना साथीचा विळखा राज्यात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर एक सेवावृती डॉक्टर आपले तीन महिन्यांपूर्वी सुरू झालेले नवे हॉस्पिटल बंद करून जिल्हा सामान्य रुग्णालयात फिजिशियन म्हणून दाखल होतो. आणि मानवतेच्या अधिक निकट जातो, हे उदाहरण वाईतील महेश मेणबुदले या माणुसकीची जाण आणि कर्तव्याची आण घेतलेल्या डॉक्टरांनी घालून दिले आहे.
डॉ. मेणबुदले स्वत:ची प्रॅक्टिस सुरू करण्यापूर्वी राज्य शासनाच्या आरोग्य सेवेत होते. त्यांनी दुर्गम तापोळा खोऱ्यात, कवठे(वाई) आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून उत्कृष्ट सेवा बजावली आहे. माणुसकीचा आणि आपल्या उपचारांतून रुग्णसेवा ही ईश्वरसेवा असा संदेश देणा-या या डॉक्टरांची कामावरची निष्ठा म्हणूनच नजरेत भरणारी. डॉक्टरांनी अवघ्या ३ महिन्यांपूर्वी वाई येथे स्पंदन हेल्थ केअर नावाचे हॉस्पिटल सुरू केले. प्रख्यात मधुमेह व हृदय आरोग्य तज्ज्ञ म्हणून त्यांची वाई, जावळी, खंडाळा, महाबळेश्वर, कोरेगाव तालुक्यांत ख्याती. त्यामुळे हे डॉक्टर मशिनरी वृत्तीने काम करतात, असा रुग्णांचा त्यांच्याबद्दलचा ठाम विश्वास. त्यातूनच वाईच्या मिशन हॉस्पिटलमध्येही डॉक्टर रुग्णसेवा करीत. नुकतेच त्यांनी स्वत:चे हॉस्पिटल उभे केले.
या नव्या रुग्णालयाची घडी बसण्यापूर्वी जगाला भीती दाखवणाºया विषाणू संसर्गजन्य कोरोना या आजाराने ग्रासले. आपले बांधव, आपल्यावर विश्वास असलेल्या रुग्णांची सेवा करण्यासाठी आपण जायला हवं, असं डॉक्टरांना वाटलं, तसा त्यांनी शासनाकडे अर्ज सादर केला आणि १० एप्रिलपासून ते साताºयाच्या क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात विनामोबदला रुग्णसेवेसाठी रुजूही झाले. त्यांना समजलं होतं की, जिल्हा रुग्णालयात फिजिशियन हे पद रिक्त आहे. आणि आपण ते काम करू शकतो. असा आतला आवाज त्यांच्या सद्सद्विवेकबुद्धीने दिला आणि डॉक्टरांनी उत्तम चाललेली प्रॅक्टिस, तत्काळ बंद करून आपलं हॉस्पिटल लॉकडाऊन केलं आणि रुग्णसेवा क्षेत्रापुढे आदर्श ठेवला.
कोरोनाने जगात हाहाकार माजविला आहे. या लढाईत डॉक्टरांच्या सेवेची नितांत गरज आहे. मी चौदा वर्षे शासकीय वैद्यकीय क्षेत्रात दुर्गम भागात सेवा केली आहे. अशावेळी देशाला माझी गरज आहे, देशसेवा करण्याच्या जाणिवेतून मी महिनाभर जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्णांची सेवा करणार आहे. आपला जिल्हा, राज्य कोरोनामुक्त करण्यासाठी माझा उपयोग झाला तर त्याचे मला समाधान असणार आहे.
-डॉ. महेश मेणबुदले