कोणी लस देता का लस !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 05:02 AM2021-05-05T05:02:43+5:302021-05-05T05:02:43+5:30

सातारा : जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यात आता १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोरोनाची लस देण्यास सुरुवात झाली असली तरी अपुरा ...

Does anyone vaccinate! | कोणी लस देता का लस !

कोणी लस देता का लस !

Next

सातारा : जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यात आता १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोरोनाची लस देण्यास सुरुवात झाली असली तरी अपुरा पुरवठा आहे. दोन दिवसांत अवघ्या १४५२ जणांना लस मिळाली. सध्या शासकीय आरोग्य केंद्रात प्रायोगिक तत्त्वावर पाच ठिकाणी हे लसीकरण होत असले तरी अडखळतच सुरुवात आहे. त्यामुळे कोणी लस देता का लस म्हणण्याची वेळ लाभार्थ्यांवर आली आहे.

जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून कोरोना लसीकरणाला प्रारंभ झाला. सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यात फ्रंटलाइन वर्कर्सना लस देण्यात आली. त्यानंतर ६० वर्षांवरील ज्येष्ठ आणि ४५ ते ५९ वर्षांतील कोमॉर्बिड नागरिकांना कोरोना लसीचा डोस देण्यास सुरुवात झाली. दुसऱ्या टप्प्यात ४५ वर्षांवरील सर्वांनाच लस मिळू लागली. त्यासाठी शासकीय आरोग्य केंद्रे आणि खासगी काही रुग्णालयात ही सुविधा सुरू झाली. शासकीयमध्ये मोफत लस देण्यात येत आहे.

आता १ मे पासून कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस देण्याचा निर्णय झाला; पण हा निर्णय सद्यस्थितीत तरी यशस्वी होताना दिसून येत नाही. कारण, कोरोना लसीचा साठाच उपलब्ध होत नाही. अगोदरच ४५ वर्षांवरील नागरिकांना लस मिळण्याचे प्रमाण कमी आहे. त्यातच आता १८ वर्षांवरील नागरिक वाढले. त्यामुळे लस द्यायची कशी, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जिल्ह्यात ९ लाखांवर ४५ वर्षांवरील कोरोना लस लाभार्थी असून, १८ ते ४४ वयोगटातील जवळपास ११ लाखांहून अधिक आहेत. आता ११ लाख लोकांचा ताण आरोग्य विभागावर आहे. सध्या जिल्ह्यातील शासकीय ५ आरोग्य केंद्रातच १८ वर्षांवरील कोरोना लसीकरण सुरू आहे. तीन दिवसांत अवघ्या १४५२ जणांनाच लसीकरण झालेले आहे. त्यातच लस उपलब्ध नसल्याने सोमवारी जिल्ह्यात कोठेही लसीकरण झाले नाही.

चौकट :

ऐकूण लसीकरण ५२६१२१

फ्रंटलाइन वर्कर पहिला डोस ३८८०३९

फ्रंटलाइन वर्कर दुसरा डोस १९०१६

.....................................

६० पेक्षा जास्त वयाचे नागरिक

पहिला डोस २३६५९२

दुसरा डोस २८४११

..............................

४५ पेक्षा जास्त वयाचे नागरिक

पहिला डोस २२०५९२

दुसरा डोस १४३६८

..........................

वयोगटानुसार माहिती...

६० वर्षांवरील...

जिल्ह्यात ६० वर्षांवरील कोरोना लसीकरणाचे लाभार्थी ४ लाखांवर आहेत. त्यामधील २ लाख ३६ हजार ५९२ जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. यामधील २८ हजार ४११ नागरिकांना लसीचा दुसरा डोसही देण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिक अधिक करून शासकीय आरोग्य केंद्रात लस घेण्यास प्राधान्य देत असल्याचे समोर आले आहे.

..............................

४५ ते ५९ वर्षांतील

जिल्ह्यातील ४५ ते ६० वर्षांतील २ लाख २० हजार ५९३ जणांना कोरोना लस मिळाली आहे. तर यातील २८४११ जणांनी दुसरा डोसही घेतला आहे. या वयोगटातील नागरिकांना ऑनलाइन रजिस्ट्रेशन करून किंवा आरोग्य केंद्रात जाऊन लस घेता येते.

...........................

१८ वर्षांवरील लस घेतलेले नागरिक

जिल्ह्यात एक मे पासून १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण सुरू आहे; पण सध्या खासगीमध्ये लसीकरण सुरू नाही; मात्र शासकीय ५ आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध आहे. संपूर्ण ऑनलाइन रजिस्ट्रेशन करून व तारीख निश्चित करून संबंधित दिवशी लस घ्यावी लागते.

....................................

कोणाला पहिला मिळेना तर कोणाला दुसरा...

मागील काही दिवसांपासून कोरोना लस घेण्यासाठी प्रयत्न करत आहे. गावापासून लसीकरण केंद्र दूर आहे. त्याठिकाणी गेल्यावर कधी लस उपलब्ध नसते, तर काही वेळा गर्दी असते. त्यामुळे आतापर्यंत लसीचा पहिला डोसही मिळालेला नाही.

- रामराव पाटील

........................

कोरोनाच्या लसीचा पहिला डोस घेऊन आता बरेच दिवस झाले आहेत. त्यावेळी रांग लावून लस घेतली. आता दुसऱ्या डोसची प्रतीक्षा आहे. शासनाने कोरोना लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध केली तर सर्वांनाच मिळेल.

- कांताराम पवार

...............................

कोरोना लसीचा पहिला डोस मिळाला आहे. आता दुसऱ्या डोसची प्रतीक्षा लागून राहिली आहे. लसीमुळे सकारात्मक बदल दिसून येतात. दुसरा डोस लवकर मिळाल्यास कोरोनाची भीती आणखी दूर होण्यास मदत होईल.

- प्रल्हाद आटपाडकर

.............................

कोट :

जिल्ह्यात १८ ते ४४ वर्षांतील नागरिकांना प्रायोगिक तत्त्वावर कोरोना लसीकरण सुरू झालेले आहे. त्यासाठी जिल्ह्यात शासकीय ५ आरोग्य केंद्राच्या ठिकाणी सुविधा सुरू आहे. या लसीकरणासाठी अ‍ॅपवर नोंदणी करावी लागते, तसेच अ‍ॅप चालते का नाही, ते पहावे लागणार आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. त्यासाठी नागरिकांनी खूपच काळजी घ्यावी. शासकीय नियमांचे पालन करावे तरच कोरोनापासून दूर राहता येईल.

- डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी

..................................

गर्दीचा फोटो दोन कॉलम...

०३सातारा लसीकरण रांग फोटो...

फोटो ओळ : सातारा येथे जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर कोरोना लस घेण्यासाठी नागरिकांची रांग लागत आहे.

................................................................

Web Title: Does anyone vaccinate!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.