बाधितांना ताटकळत ठेवणे मुख्यमंत्र्यांना शोभते का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:41 AM2021-07-27T04:41:18+5:302021-07-27T04:41:18+5:30
कऱ्हाड : राज्याचे मुख्यमंत्री अद्याप हवेतच आहेत आणि मनसे जमिनीवर आहे. मनसे आजही तळागाळात पोहोचते. मुख्यमंत्र्यांना जनतेसाठी वेळ नाही. ...
कऱ्हाड : राज्याचे मुख्यमंत्री अद्याप हवेतच आहेत आणि मनसे जमिनीवर आहे. मनसे आजही तळागाळात पोहोचते. मुख्यमंत्र्यांना जनतेसाठी वेळ नाही. खराब हवामान आणि पावसाची कारणे देऊन वेळकाढूपणा करणे आणि बाधितांना ताटकळत ठेवणे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शोभते का, असा प्रश्न मनसेचे प्रवक्ता संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला.
कोयनानगर विभागात भूस्खलनातील बाधित भागाची पाहणी तसेच स्थलांतरित ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी संतोष धुरी, रवींद्र शेलार, गोरख नारकर, दयानंद नलवडे, आदी उपस्थित होते.
संदीप देशपांडे म्हणाले, मुख्यमंत्र्यांना या बाधित कुटुंबीयांना भेटायला यायचे असते तर ते कसेही आले असते आणि त्यांच्या व्यथा जाणल्या असत्या. येथील परिस्थिती त्यांना समजली असती. राज्याच्या मंत्रिमंडळातील इतर मंत्री, नेते, सामाजिक कार्यकर्ते शक्य होईल त्यामार्गाने पाटण तालुक्यात धाव घेत आहेत. मात्र, मुख्यमंत्र्यांना ते जमत नाही, हे दुर्दैव आहे. बाधितांचे प्रश्न सोडविण्यासाठी मनसे कटिबद्ध असून, त्यांना शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळावी, यासाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही संदीप देशपांडे यांनी यावेळी दिली.
फोटो : २६ केआरडी ०३
कॅप्शन : कोयनानगर विभागातील बाधित ग्रामस्थांशी मनसेचे प्रवक्ता संदीप देशपांडे यांनी चर्चा केली.