श्वानांचा उपद्रव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:39 AM2021-03-17T04:39:53+5:302021-03-17T04:39:53+5:30
तांबवे : परिसरात मोकाट श्वानांच्या उपद्रवात वाढ झाली असल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. या मोकाट श्वानांनी परिसरातील काही गावांमध्ये ...
तांबवे : परिसरात मोकाट श्वानांच्या उपद्रवात वाढ झाली असल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. या मोकाट श्वानांनी परिसरातील काही गावांमध्ये दहा दिवसात अनेक पाळीव जनावरांवर हल्ले केले आहेत. होणारे नुकसान टाळण्यासाठी ग्रामपंचायतीने तत्काळ या श्वानांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
नियमांची पायमल्ली
कऱ्हाड : येथील भेदा चौकात वाहन चालकांकडून वाहतूक नियमांची खुलेआम पायमल्ली सुरू आहे. तहसील कार्यालयाकडून कोल्हापूर नाका परिसराकडे जाणारे वाहनचालक चुकीच्या पद्धतीने वळण घेत असतात. त्यामुळे पोपटभाई पेट्रोल पंपाकडून येणारे वाहनचालक तसेच कार्वेनाका बाजूकडून येणारी वाहने गोंधळात पडतात. वाहतूक पोलिसांसमोरही अनेकदा वाहतूक नियमांची पायमल्ली होते.
रिक्षांमुळे कोंडी (फोटो : १६इन्फो०२)
कऱ्हाड : शहरातील कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा चौक तसेच बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. रस्त्याकडेला काही रिक्षाचालकांनी आपल्या रिक्षा बसस्थानकासमोरील रस्त्यावरच उभ्या केल्यामुळे या मार्गावर दुचाकी व चारचाकी वाहनांच्या रांगा लागत आहेत.
जीव धोक्यात
कुसूर : शिंंदेवाडी ता.कऱ्हाड या ठिकाणी धोकादायक वळण असल्याने रात्रीच्यावेळी वाहन चालकांना अंदाज येत नसल्याने त्यांचे अपघात होत आहेत. या वळणावर अपघात होऊ नये म्हणून संबंधित विभागाने दिशादर्शक व सूचना फलक लावावेत, अशी मागणी सध्या वाहन चालकांतून केली जात आहे.
चौपदरीकरण गतीने
कऱ्हाड : कऱ्हाड ते पाटण रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. ठिकठिकाणी जोड रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तर काही ठिकाणी दुभाजक उभारले जात आहेत. कऱ्हाड नजीकच्या वारुंजी फाट्यापासून सुपने गावापर्यंत रस्त्यावर साईडपट्ट्यांना पांढरे पट्टेही मारण्यात आले आहेत. उर्वरित कामही येत्या काही दिवसांत पूर्ण होण्याची चिन्हे आहेत.