मूकबधिर चिमुकलीवर कुत्र्यांचा झुंडीने हल्ला
By admin | Published: February 17, 2016 11:50 PM2016-02-17T23:50:53+5:302016-02-18T21:15:09+5:30
शाहूनगरमधील घटना : भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाचा मुद्दा ऐरणीवर
सातारा : अवघ्या सहा वर्षांच्या चिमुकलीवर चार ते पाच कुत्र्यांनी झुंडीने हल्ला केल्याची घटना शाहूनगर परिसरात घडली. मुलगी मूकबधिर असल्यामुळे मदतीसाठी ओरडूही शकली नाही. त्यामुळे या हल्ल्यात तिला गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या असून, तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे शहरातील वाढती भटकी कुत्री आणि त्यांच्या उपद्रवाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
श्रावणी बंडू पवार असे या चिमुकलीचे नाव आहे. चारभिंती टेकडीच्या मागे, शाहूनगर भागात हिलटॉप गार्डन हाउसिंग सोसायटीत ती राहते. तिचे वडील फ्लेक्स फलक लावण्याचे काम करतात. समता शिक्षण प्रसारक मंडळाच्या मूकबधिर विद्यालयात इयत्ता पहिलीत शिकणारी श्रावणी घराच्या परिसरात मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान खेळत होती. ही वसाहतच डोंगरउतारावर आहे. उतारावरील झाडीजवळ श्रावणी असताना डोंगरउतारावरून चार-पाच कुत्री वेगाने आली आणि त्यांनी श्रावणीवर हल्ला चढविला.
श्रावणी ओरडूही शकत नसल्यामुळे तिला मदत मागता आली नाही. आसपासही कोणी नव्हते. अखेर त्याच कॉलनीत पवार यांच्या घरासमोर राहणाऱ्या श्रद्धा धनंजय कुंभार यांना हा प्रकार दिसला. कुत्र्यांच्या गराड्यात लहानगी श्रद्धा असल्याचे दिसताच हातात काठी आणि दगड घेऊन त्या मदतीला धावून आल्या. कुत्र्यांना हाकवून त्यांनी श्रावणीला उचलून घेतले, तेव्हा ती रक्तबंबाळ झाली होती. कुत्र्यांनी तिच्या मांडीला आणि पोटाला खोलवर चावे घेऊन लचके काढले होते. श्रद्धा कुंभार यांनी श्रावणीला त्वरित तिच्या घरी पोहोचविले आणि तिच्या आईला हा प्रकार सांगितला. नंतर तातडीने तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. श्रावणीवर उपचार सुरू असून, प्रकृती सुधारत आहे. (प्रतिनिधी)
कुत्र्यांचा आवाज आल्याने माझे लक्ष गेले तेव्हा चार-पाच कुत्री श्रावणीचे चावे घेत होती. कुत्र्यांनी डोंगर उतारावरून श्रावणीला सुमारे पंधरा ते वीस फूट खाली फरफटत आणले होते. दगड मारून, काठी उगारून मी कुत्र्यांना हाकलवले आणि श्रावणीला उचलून तिच्या आईला हाका मारल्या. आमची घरे समोरासमोर आहेत. ही घटना घरापासून सुमारे पन्नास फुटांवर घडली.
- श्रद्धा धनंजय कुंभार