थकबाकीदारांची नावे झळकणार फलकावर कऱ्हाडात
By admin | Published: February 15, 2016 11:06 PM2016-02-15T23:06:05+5:302016-02-16T00:01:52+5:30
दोन वर्षांपासून वसुली संथगतीने : घर, पाणीपट्टीचे सहा हजारांहून जास्त थकबाकीदार; सात प्रभागात लागणार फलक; कार्यवाहीस प्रारंभ
कऱ्हाड : कऱ्हाड शहरात गेल्या दोन वर्षांपासून पालिकेच्या घरपट्टी व पाणीपट्टीची थकीत ठेवणाऱ्यांवर पालिकेकडून युद्धपातळीवर कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्याबाबत नुकतेच मुख्याधिकाऱ्यांनी करवसुली प्रमुखांना आदेश दिले आहेत. त्यामुळे तब्बल एकूण मागणी अठरा कोटी रक्कम आहे. १ एप्रिल २०१५-२०१६ या वर्षातील एकूण थकीत रकमेपैकी ५४ टक्के वसुली सध्या पूर्ण झालेली आहे. मात्र त्याव्यतिरिक्त व मागील दोन वर्षांपासून रक्कम न भरलेल्या थकबाकीधारकांची नावे आता शहरातील चौका-चौकात लावण्यात येणाऱ्या ‘फलकवर’ झळकणार आहेत. कऱ्हाड शहरातील वाढीव भागासह शहरातील अंतर्गत भागात मागील वर्षी व या वर्षीचे ६ हजार ११६ थकबाकी धारक आहेत. त्यांच्या विरोधात पालिकेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी कर वसुली करण्याबाबत युद्धपातळीवर कारवाई करत संबंधितांची नावे फलकवर टाकून ती चौकात लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहरातील थकबाकीदारांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. ती नावे पेठनिहाय तयार करण्यात येणार असून, प्रत्येक पेठेत व चौकात लावण्यात येणार आहे. तसेच शहरातील सर्व पेठांतील थकबाकीधारकांची एकत्रित नावे ही कृष्णाबाई घाटावर फलकद्वारे लावण्यात येणार आहेत. थकबाकीधारकांना यापूर्वी पालिकेने वारंवार नोटिसा बजावूनही त्यांच्याकडून थकबाकीची रक्कम भरण्यात येत नाही. वर्षाच्या शेवटी एखादा दिवस गाठून कराची रक्कम भरली जाते. मात्र, सध्या गेल्या दोन वर्षांपासून २०० हून अधिक मोठ्या थकबाकीधारकांनी ही रक्कम भरलीच नसून तसेच यामध्ये मोठ-मोठ्या व्यापारी, प्रतिष्ठित नागरिक व पालिकेतील काही नगरसेवकांचे निकटवर्तीयांचाही समावेश असल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे. पालिकेच्या सुविधांची एकूण कर येणेबाकीधारकांची नावे फलकवर टाकली जाणार आहेत. पालिकेला यंदाच्या वर्षी १८ कोटींचे उद्दिष्ट मार्चअखेर पूर्ण करावयाचे आहे. त्यापैकी नियमित मिळकतधारकांकडून फक्त ४० टक्के वसुली झाली असल्याचे सांगितले जात आहे. उर्वरित ५३ टक्के वसुली मार्चअखेरपर्यंत करण्यात येणार आहे. दरवर्षी करवसुलीची मोहीम जानेवारीपासून सुरू केली तरी मार्चअखेरपर्यंत मिळकतधारक बिले भरत नसल्याने पालिकेकडून कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन वर्षांपासून पालिकेच्या घरपट्टी व पाणीपट्टीसह इतर कर भरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आले. दरवर्षी मार्चअखेर कर भरले जातात. शिवाय सहा महिन्याच्या थकबाकीवर २ टक्के व्याजाची रक्कम आकारण्यात येत आहे. असल्याने नागरिकांमध्ये जागृती निर्माण होणे गरजेचे आहे. त्यामुळे यावर्षी थकीत कररकमेत वाढ झालेली आहे. (प्रतिनिधी) सात प्रभागातून १३ क्लार्क, अधिकाऱ्यांमार्फत वसुली व कारवाई कऱ्हाड शहरात एकूण सात प्रभाग आहेत. शहरातील सात प्रभागातील नागरिकांकडून करवसुली करण्यासाठी पालिकेत स्वतंत्र करवसुली विभाग कार्यरत करण्यात आला आहे. या विभागात वर्षभरातील बारामहिने करवसुली सुरूच असते. सध्या शहरताील सात प्रभागातून करवसुली विभागातील तेरा वसुली क्लार्कमार्फ त थकीत करवसुली व नळकनेक्शन तोडण्याची मोहीम राबविली जात आहे. ८४ लाख रूपये थकीत रक्कम एकादिवसात जमा कऱ्हाड पालिकेतील २०१४ -१५ वर्षातील येणबाकी थकबाकीधारकांनी एका दिवसांत तब्बल ८४ लाख रूपये जमा के ले होते. ३१ मार्च २०१५ रोजी या दिवशी जमा केले होते. मागील वर्षी १५ कोटी उद्दिष्ट होते.. कऱ्हाड पालिकेकडून दरवर्षी जानेवारीपासून करवसुलीची मोहीम राबविली जाते. वर्षभर ही मोहीम संथगतीने जरी राबविली जात असली, तरी त्याबाबत नागरिकांकडून करभरण्यास दिरंगाईच केली जाते. यावर्षी जरी साडेअठरा कोटी एकूण करवसुलीचे उद्दिष्ट असले, तरी मागील वर्षी हे प्रमाण १५ कोटी एवढे होते. कऱ्हाड शहरात पालिकेकडून मोठ्या प्रमाणात पाणीपट्टी व घरपट्टी वसुलीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेचे प्रमुख टप्पे तयार करण्यात आले आहे. पहिल्यांदा नोटिसांचा टप्पा पूर्ण करण्यात आला आहे. तर दुसऱ्या टप्प्यात नळकनेक्शन तोडले जाणार आहे व त्यानंतर थकबाकीधारकांची नावे प्रत्येक्ष फलकवर टाकली जाणार आहेत. - विनायक औंधकर, मुख्याधिकारी, नगरपालिका, कऱ्हाड