डॉल्बी अन् फटाक्यांचा खर्च दुष्काळग्रस्तांना!
By admin | Published: September 15, 2015 11:50 PM2015-09-15T23:50:11+5:302015-09-16T12:09:08+5:30
खंडाळ्यातही बदलाची लाट : सर्व गणेशोत्सव मंडळांनी जपली समााजिक बांधिलकी
खंडाळा : समाज म्हणजे एकतेचे प्रतीक आहे. समाजाचं हित जोपासणं हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. याच कर्तव्यदक्ष भावनेतून सामाजिकतेचे भान ठेवून पारगावच्या तरूणांनी गणेशोत्सवाच्या मुहुर्तावर क्रांतिकारी निर्णय घेत डॉल्बीमुक्तीचा नारा दिला आहे. डॉल्बी, गुलाल अन् फटाक्यांवर होणाऱ्या खर्चाला फाटा देऊन दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचाही निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे खंडाळा तालुक्यातून कौतुक होत आहे.
जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असल्यामुळे गणेश मंडळांनी दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात देण्याबाबत ‘लोकमत’ने केलेल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळत असून आता बाप्पाच्या मंडपात माणुसकीचा जागर सुरू झाला आहे. गणेशोत्सव म्हटलं की, दहा दिवस डॉल्बी, फटाके आणि मिरवणुकीतून गुलालाची उधळण आलीच; पण, यामुळे होणारे ध्वनी, वायू प्रदूषण लक्षात घेऊन पारगावच्या गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. सामाजिक कार्यकर्ते अजित यादव यांनी समन्वयकाची भूमिका बजावली. खंडाळ्याचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे दोनशे तरूणांची बैठक घेऊन हा निर्णय एकमुखी घेतला. यामध्ये पारगावमधील न्यू भारत तरूण मंडळ, शिवाजी गणेश मंडळ, जानुबाई तरूण मंडळ, भीमाशंकर गणेशोत्सव मंडळ, न्यू सम्राट तरूण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व सभासदांनी सक्रिय सहभाग घेतला. या मंडळांचे अध्यक्ष राजेश यादव, महेश गायकवाड, योगेश चव्हाण, मयूर ढमाळ, गणेश सासणे यांनी आपापल्या मंडळातील कार्यकर्त्यांना डॉल्बीमुक्तीची संकल्पना पटवून दिली.
गणेशमंडळांनी मिरवणुकीत गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करायची नाही. गणेशोत्सवच नव्हे तर इतर कोणत्याही कार्यक्रमात डॉल्बीचा वापर करायचा नाही. ढोल-लेझीम पथक, हलगी वादन अशा पारंपरिक पद्धतीने मिरवणुका काढण्याचा निर्णय घेतला आहे.
विशेषत: गणेशोत्सव काळात अधिकाधिक खर्च करून, मोठे मोठे डॉल्बी वाजवून आपले मंडळ कसे श्रीमंत आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न केला जातो. खंडाळ्यात औद्योगिकीकरण वाढल्याने अशा गोष्टींवर अधिक भर असताना पारगावच्या तरूण मंडळांनी घेतलेला निर्णय सर्वांसाठी प्रेरणादायी व दिशादर्शक ठरत आहे.
दुष्काळग्रस्तांसाठी लाखाचं योगदान
सातारा जिल्ह्यात यावर्षी कमी पाऊस असल्याने दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. त्याचबरोबर राज्यातही दुष्काळ आहे. त्यामुळे येथील जानुबाई तरूण मंडळाने डॉल्बीवर होणाऱ्या खर्चात भर घालून ५० हजार रूपये व अन्य एका मंडळाने ५० हजार रूपये असा लाख रूपयांचा निधी जमा करून दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. दुष्काळाने हतबल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा हा त्यांचा प्रयत्न लाखमोलाचा आहे.(प्रतिनिधी)