आभाळ कोसळणार नाही, डीजे वाजलाच पाहिजे; उदयनराजेंची रोखठोक भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 06:10 PM2022-08-19T18:10:26+5:302022-08-19T18:16:59+5:30
ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित करून जे लोक डीजेला विरोध करत आहेत त्यांनी जिल्ह्यातील मोठ्या कारखान्यांकडून होत असलेले प्रदूषण आधी पहावे.
सचिन काकडे
सातारा : ''डीजेला विरोध करणाऱ्यांना घरगुती कार्यक्रमात, लग्नात डीजे चालतो. मग सार्वजनिक कार्यक्रमांमध्येच तो का नको? कारखान्यांकडून प्रचंड प्रमाणात प्रदूषण केले जात आहे. त्याच्यापुढे ध्वनी प्रदूषण तर फार किरकोळ बाब आहे. काही झालं तरी डीजे वाजलाच पाहिजे. दोन-तीन तास तो वाजल्यास आभाळ कोसळणार नाही,'' अशी रोखठोक भूमिका खासदार उदयनराजे भोसले यांनी मांडली.
सातारा शहरात गेल्या काही दिवसांपासून डीजेचा मुद्दा चर्चेचा विषय ठरला आहे. व्यावसायिकांकडून यंदा डीजेला परवानगी द्यावी अशी मागणी केली जात आहे तर दुसरीकडे नागरिकांकडून याला कडाडून विरोध केला जात आहे. पोलीस प्रशासनाने देखील डीजेला कोणत्याही परिस्थितीत परवानगी देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. याविषयी खा. उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधताना आपली भूमिका स्पष्ट केली.
ते म्हणाले, तुम्ही डीजेला परवानगी द्या अगर नका देऊ; परंतु ज्या व्यावसायिकांनी बँकांचे कर्ज काढून हा व्यवसाय उभा केला त्यांनी काय हातात वाडगं घेऊन बसावं का? जर हे व्यवसायिक स्वतःच्या पायावर उभे राहत असतील तर त्यांना शासनाने सहकार्यच केले पाहिजे.
आधी कारखान्यांकडून होणारे प्रदूषण पहावे
ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित करून जे लोक डीजेला विरोध करत आहेत त्यांनी जिल्ह्यातील मोठ्या कारखान्यांकडून होत असलेले प्रदूषण आधी पहावे. आज कितीतरी लोक कॅन्सरने बाधित होत आहेत. असे प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांवर प्रथम कारवाई करायला हवी. मात्र काही मंडळी केवळ डीजेलाच विरोध करीत आहे.
..तर त्यांचे पालकत्व स्वीकारावे
ज्या व्यावसायिकांनी बँकांचे, पतसंस्थांचे कर्ज काढून व्यवसाय उभा केला त्यांच्यावरच आज उपासमारीची वेळ आली आहे. कुटुंब कसे चालवावे, हा मोठा प्रश्न त्यांना पडला आहे. डीजेला परवानगी द्यायची नसेल तर शासनाने त्यांचे पालकत्व स्वीकारावे. त्यांची सगळी देणी भागवावीत. डीजे का नको हे शासनाने सांगावे. त्याची कारणे स्पष्ट करावी. दोन-तीन तास डीजे वाजला म्हणजे काय मोठं आभाळ कोसळणार नाही; परंतु जर डीजेला परवानगी दिली नाही तर व्यवसायिकांवर मोठ संकट निश्चित कोसळेल. काही झालं तरी डीजेला परवानगी मिळायलाच हवी.