नावजीनाथांच्या किवळमध्येही डॉल्बी पराभूत्
By admin | Published: May 31, 2015 10:16 PM2015-05-31T22:16:51+5:302015-06-01T00:15:12+5:30
आव्वाज गावाचा... ..नाय डॉल्बीचा !
मसूर : मसूरच्या पूर्वेस सुमारे चार किलोमीटर अंतरावर किवळ (ता. कराड) गाव आहे. जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत झालेल्या ओढाजोड प्रकल्पामुळे व पाणलोटची अनेक कामे झाल्यामुळे सध्या या गावाची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. ‘लोकमत’ने सुरू केलेल्या लोकचळवळीत सहभागी होऊन आता गावकऱ्यांनी एक पाउल पुढे टाकले असून, डॉल्बीबंदीचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेतल्यापासून गावात कुठेही डॉल्बीचा निनाद ऐकायला येत नसल्याने आबालवृध्दांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
किवळ गावास महाराष्ट्रातून अनेक गावांतून लोक भेटी देऊन येथील पाणलोटच्या कामाचे कौतुक करत आहेत. या गावातील ग्रामस्थांनी लोकसहभाग व शासनाच्या मदतीने पाणलोटची अनेक कामे केली असून, एकेकाळी टँकरग्रस्त असणारे हे गाव टँकरमुक्त केले आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत श्री जोतिर्लिंगाचे निस्सीम भक्त संत नावजीनाथांचे किवळ म्हणून या गावाची ख्याती महाराष्ट्रभर आहे.
लग्नात डॉल्बीेच्या तालावर तरूणांच्या बरोबरीने वयोवृध्द आणि शेवटी नवरा-नवरीही ठेका धरत असत. डॉल्बीच्या आवाजाने घरांतील भांडी खाली पडत. डॉल्बीच्या तालावर तरुणाई बेधुंद होऊन थिरकत असताना संपूर्ण गाव निमूटपणे सर्व सहन करीत असत. पण ‘लोकमत’च्या चळवळीमुळे मानसिकता बदलू लागली आहे. गुळुंबप्रमाणे आपलेही गाव डॉल्बीमुक्त करण्यासाठी किवळच्या ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे. (वार्ताहर)
शासन व लोकसहभागातून गावामध्ये अनेक समाजोपयोगी कामे झाली आहेत. आता एक पाउल पुढे टाकून वृध्दांना, आजारी व्यक्तींना त्रास होऊ नये म्हणून गावात डॉल्बीबंदीचा निर्णय घेतला आहे.
- कल्पना साळुंखे, सरपंच, किवळ
संत नावजीनाथांमुळे गावाची महाराष्ट्रात एक वेगळी ओळख आहे. त्यामुळे सर्वजण मिळून आदर्श गाव होण्यासाठी प्रयत्नशील आहोत. यातूनच आम्ही डॉल्बीबंदीचा निर्णय ग्रामसभेत घेतला आहे.
- सुनील साळुंखे, उपसरपंच, किवळ