यंदाही ‘डॉल्बी’ होणार शिरवळमधून हद्दपार !
By Admin | Published: August 24, 2016 10:39 PM2016-08-24T22:39:24+5:302016-08-24T23:41:29+5:30
शांतता कमिटीची बैठक : गणेशोत्सवात घुमणार पारंपरिक वाद्यांचा आवाज
शिरवळ : ‘लोकमत’ने सुरू केलेल्या ‘आव्वाज गावाचा नाय डॉल्बीचा’ या चळवळीला शिरवळ व परिसरात यश आले असून, शांतता कमिटीच्या बैठकीत पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत डॉल्बीमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.
‘शिरवळमधील गणेशोत्सवाची परंपरा ही वाखाणण्याजोगी असून, शिरवळमधील गणेश मंडळांनी परंपरा जोपासत पारंपरिक वाद्यांचा वापर करत शिरवळचा नावलौकिक वाढविण्यासाठी आगामी गणेशोत्सवाच्या काळात डॉल्बीला फाटा देत डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू करावी. डॉल्बीला कोणत्याही परिस्थितीत थारा देण्यात येणार नसून प्रसंगी कठोर कायदा अवलंबत डॉल्बीही जप्त करण्यात येईल,’ असा इशारा शिरवळ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संभाजीराव म्हेत्रे यांनी दिला आहे.
शिरवळ (ता. खंडाळा) येथील जय तुळजा भवानी मंगल कार्यालयात शिरवळ पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शांतता कमिटी व गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी शिरवळ उपसरपंच उदय कबुले, लोणंद कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राजेंद्र तांबे, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप माने, विजय पवार, माजी उपसरपंच भापकर, तंटामुक्त अध्यक्ष संदीप गायकवाड, आरपीआय तालुकाध्यक्ष दादासाहेब कांबळे, राजेश शेटे, हृषीकेश मोहिते, बाळासाहेब जाधव, हेमंत तारू, अरविंद ननावरे, ताहेर काझी, सोमनाथ बरदाडे, बंटी बरदाडे, आकाश कबुले, सहायक पोलिस निरीक्षक स्मिता पाटील, पोलिस उपनिरीक्षक सुनील पवार, परिविक्षाधीन पोलिस उपनिरीक्षक छाया बोरकर, शिवसेना उपतालुकाप्रमुख गणेश जाधव आदी उपस्थित होते .
यावेळी प्रदीप माने म्हणाले, ‘शिरवळमधील गणेश मंडळ हे नियमाचे पालन करणारे असून, कायद्याच्या कचोटीत राहून पोलिसांच्या सर्व अटी पाळून गणेश मंडळांना कमी आवाजाची मर्यादा घालत डॉल्बीला परवानगी द्यावी.’
राजेंद्र तांबे म्हणाले, ‘शिरवळचा नावलौकिक जिल्ह्यात वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार असून, गुलालमुक्त व ध्वनिप्रदूषणमुक्त गणेशोत्सव राबविण्यासाठी पोलिसांनी गणेश मंडळांना साऊंड सिस्टीम वापरण्यासाठी कायदेशीर परवानगी द्यावी.’
उदय कबुले म्हणाले, ‘स्वच्छ व सुंदर निरामाता उपक्रमासाठी सामाजिक बांधिलकीतून शिरवळ ग्रामपंचायत निर्माल्य कुंडासाठी सर्वतोपरी मदत करणार आहे.’
आदेश भापकर म्हणाले, ‘गेल्यावर्षी प्रमाणे याहीवर्षी सामाजिक बांधिलकीतून निरामय स्वच्छता अभियान राबिवण्यात येणार असून, गणेश विसर्जनादिवशी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नीरा नदीजवळ निर्माल्य कुंड व गणेशमूर्ती विसर्जनासाठी तळे उभारावे.’ यावेळी संदीप गायकवाड, राजेश शेटे, संपत मगर, सुनील पवार यांनी मनोगत व्यक्त केले .
पोलिस उपनिरीक्षक सुनील पवार यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)
इतर मंडळांनीही अनुकरण करावे : संपत मगर
शिरवळमधील सर्वात मोठे असणारे गणेश मंडळ म्हणून केदारेश्वर तरुण मंडळ ओळखले जाते. यावेळी बैठकीमध्ये शिरवळ पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत केदारेश्वर तरुण मंडळ हे गणेशोत्सवाच्या काळात डॉल्बीमुक्त गणेश मंडळ ही संकल्पना राबवत केदारेश्वर गणेश मंडळ डॉल्बीचा वापर करणार नसल्याचे जाहीर केले . यावेळी पोलिसांनी केदारेश्वर तरुण मंडळाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करत इतर मंडळांनीही याचे अनुकरण करावे, असे आवाहन केले.
प्रदीप माने व म्हेत्रे यांच्यात चकमक
शिरवळ येथील गणेश मंडळांच्या बैठकीत प्रदीप माने यांनी डॉल्बीला परवानगी देण्याची मागणी करताच पोलिस निरीक्षक संभाजीराव म्हेत्रे यांनी कायद्याच्या चौकटीत बसत नसल्याचे सांगताच दोघांमध्ये शाब्दिक चकमक पाहण्यास मिळाली.