‘डॉल्बीमुक्ती’चा ढोल बजने लगा!
By admin | Published: September 7, 2015 08:53 PM2015-09-07T20:53:02+5:302015-09-07T20:53:02+5:30
‘लोकमत’ची चळवळ निर्णायक वळणावर : यंदाच्या उत्सवात घुमणार पारंपरिक वाद्यांचा आवाज--लोकमत इनिशिएटिव्ह
सातारा : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. बाप्पांच्या आगमनासाठी सातारकर आतुर झालेत. यंदा आपल्या लाडक्या बाप्पांचं स्वागत डॉल्बीनं नव्हे तर पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि तेही धूमधडाक्यात व्हावं, यासाठी ढम ढम ढोलांसंगे ताशांचा आवाजही कडाडणार आहे. ‘लोकमत’नं जागरुकता केल्यानंतर जिल्ह्यातील असंख्य गणेशोत्सव मंडळे ‘डॉल्बीमुक्ती’चा ढोल वाजविण्यासाठी सज्ज झाली आहेत.‘लोकमत’नं डॉल्बीच्या दुष्परिणांबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी, यासाठी ‘इनिशिएटिव्ह’ सुरू केले. परिणामी जिल्ह्यातील विविध गावांनी एकत्र येऊन डॉल्बीला हद्दपार करत सण, उत्सवांमध्ये पारंपरिक वाद्येच वाजविण्याचा निर्णय घेतला आहे. सदर बझार येथील भारतमाता मंडळाने यंदा प्रथमच स्वत:चे ढोल-ताशा पथक तयार केले आहे. पिवळ्या रंगाचा झब्बा-कुर्ता अन् डोक्यावर गांधी टोपी असा हा लक्षवेधक गणवेशातील सत्तर जणांचे हे पथक असून यामध्ये ३५ ढोल, १० ताशे, झांज, टोल, झेंडा असा लवाजमा आहे. गेल्या महिनाभरापासून हे सांस्कृतिक पथक कसून सराव करत आहे. डॉल्बीचे दुष्परिणाम दूरगामी आहे. आरोग्याबरोबरच सामाजिक स्वास्थ्य बिघडविण्यास डॉल्बी कारणीभूत ठरत असल्याच्या घटना घडत आहेत. हे चित्र बदलण्यासाठी ‘लोकमत’ने घेतलेली भूमिका आदर्शवत आहे. जिल्हाभरात ‘लोकमत’ने केलेल्या जागृतीमुळेच आज अनेक गावे डॉल्बीमुक्त झाली आहेत. गणेश मंडळांनी उत्सवाचा हेतू जपायला हवा, अशी भावना मंडळाचे विकास धुमाळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.या पथकात सुमारे सत्तर जणांचा सहभाग आहे. यामध्ये शाळकरी मुलांसह नोकरदारांचाही सहभाग आहे. त्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. कलेला वाहून घेऊन कुटुंबाकडे दुर्लक्ष होऊ नये, यासाठी वादकांना यातून पैसे मिळावेत, यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत, अशी माहिती धुमाळ यांनी दिली.
सदरबझार येथे रविवारी खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते भारतमाता सांस्कृतिक ढोल-ताशा पथकाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष सचिन सारस, गणेश भोसले, नगरसेवक संदीप साखरे, लतीफ चौधरी, सुजित जाधव, मंडळाचे अध्यक्ष सतीश कांबळे, उपाध्यक्ष बाबासाहेब शेलार, सुनील भुतकर, राजेंद्र रजपूत, प्रवीण जगदाळे, उपस्थित होते. (प्रतिनिधी)