देशी-विदेशी अन् बिअरबार परवान्यांवरून खडाजंगी
By admin | Published: December 3, 2015 09:47 PM2015-12-03T21:47:50+5:302015-12-03T23:47:53+5:30
विंग ग्रामसभा : ३० डिसेंबरला महिलांच्या सभेत होणार निर्णय
विंग : गाव तसेच परिसरात वाढत असलेल्या देशी-विदेशी दुकानांबाबत तसेच बिअरबारच्या परवान्याबाबत ग्रामस्थांमध्ये खडाजंगी झाली. विंग ता. कऱ्हाड येथे सरपंच शंकरराव खबाले यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा पार पडली. यावेळी झालेल्या ग्रामसभेत विविध समित्यांची पुनर्रचना करण्यात आली. ग्रामसभेत सदस्यांकडून मांडण्यात आलेले विषय सर्वांच्या सहमतीने सोडविण्यात आले. परंतु देशी-विदेशी आणि बिअरबारच्या परवान्याच्या विषयाला ग्रामस्थांनी विरोध दर्शविला.
बिअरबारचा विषय सभेत उपस्थित होताच कॉ. जे. एस. पाटील, अशोक यादव आणि जगन्नाथ घोरपडे यांनी त्याला विरोध केला. उपस्थित ग्रामसभेत हा ठराव सुरूवातीला ‘ना हरकत दाखला’ न देण्याबाबत मंजूर झाला होता. परंतु याला दाखला द्यायचा नसेल तर आहे तो बार बंद करा अशी सभेदरम्याने ग्रामस्थांनी सूचना केली. देशी विदेशी दुकांनासह बिअरबारला परवानगी द्यावी तसेच याबाबत ना हरकत दाखला न द्यावा या दोन्ही वेगवेगळे विषय असताना ते एकत्र केल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला. सभेदरम्यान ग्रामस्थांमध्ये व अधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी झाली. त्यावेळी सरपंच शंकरराव खबाले यांनी सभेतील वातावरण व्यवस्थित हाताळून ३० डिसेंबरला महिलांची सभा बोलावून निर्णय घेण्यात येईल असे सांगितले.
गावातील ३५० पेक्षा जास्त लोकांना स्वस्त धान्य दुकानदाराकडून लाभ मिळत नसल्याने दुकानदारावर कारवाई करण्यात यावी, अशी ग्रामस्थांकडून मागणी करण्यात आली. गावातील ग्रामस्थांना न्याय मिळण्यासाठी ग्रामविकास अधिकाऱ्यांमार्फत तहसिलदारांना निवेदन देवून चालू परवाने रद्द करावे. तसेच नवीन परवाना विंग विविध कार्यकारी सेवा सोसायटीला द्यावा असे सर्वानुमते मंजूर करण्यात आले.
विंग गावाला इरिगेशनचे पाणी पिण्यासाठी वापरले जाते परंतु चौपदरीकरणाच्या कामात पाईपलाईन फुटून नुकसान झाले आहे.
यामुळे ग्रामस्थांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. ठेकेदाराने फुटलेली पाईपलाईनचे काम न केल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी ग्रामस्थांमधून देण्यात आला आहे. (वार्ताहर)
विंग गावाला एक परंपरा व संस्कृती आहे. यामुळे तालुक्यात गावाला एक प्रतिष्ठा आहे. या प्रतिष्ठेला कुठेही गालबोट न लागता ग्रामस्थ योग्य तोच निर्णय घेतील.
- हेमंत पाटील, ग्रामस्थ, विंग