Satara: घरगुती गॅस वाहनात भरणाऱ्या अड्ड्यावर छापा, तीन रिक्षांसह साहित्य ताब्यात
By संजय पाटील | Published: October 10, 2023 11:19 AM2023-10-10T11:19:04+5:302023-10-10T11:19:43+5:30
महसूल, पोलिसांनी पहाटेच टाकली धाड
कऱ्हाड : घरगुती सिलेंडरमधील गॅस वाहनात भरून देणाऱ्या अड्ड्यावर छापा टाकण्यात आला. कऱ्हाड शहरातील बुधवार पेठेत असलेल्या चर्चेनजिक एका खोलीत हा बेकायदेशीर अड्डा चालविला जात होता. त्याठिकाणी पोलीस तसेच महसूल विभागाच्या संयुक्त पथकाने मंगळवारी पहाटे छापा टाकून तीन रिक्षांसह इतर साहित्य जप्त केले. संबंधितांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
शहरातील कासमभाई बोर्डिंगमधील एका खोलीत घरगुती गॅस बेकायदेशीरपणे रिक्षात भरण्याचा प्रकार सुरू होता. गत अनेक महिन्यांपासून संबंधितांकडून हा उद्योग केला जात होता. याबाबतची माहिती महसूल विभागाला प्राप्त झाली. दररोज अनेक रिक्षामध्ये बेकायदेशीररित्या घरगुती गॅस भरला जात होता. याबाबत संबंधित विभागाकडे वेळोवेळी तक्रारी करण्यात आल्या. मात्र संबंधित प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले होते.
मंगळवारी सकाळी प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार विजय पवार व पुरवठा विभागाचे अधिकारी महादेव अष्टेकर यांनी या अड्ड्यावर धाड टाकून कारवाई केली. यावेळी काही रिक्षाही त्याठिकाणी आढळून आल्या असून एक गॅस वाहतूक करणारे वाहनही घटनास्थळावर गॅसच्या टाक्यांसह आढळून आले आहे. घटनास्थळावर सध्या संबंधित विभागाकडून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.