पाटणच्या महिलेकडून पुण्यात घरफोड्या
By admin | Published: October 19, 2016 10:40 PM2016-10-19T22:40:53+5:302016-10-19T22:40:53+5:30
११ लाखांचे दागिने जप्त : चतृश्रृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीतच दहा गुन्हे उघडकीस
सातारा : पाटण तालुक्यातील नाढे येथे राहणाऱ्या लक्ष्मी संतोष अवघडे ऊर्फ लक्ष्मी विक्रम भिसे हिने पुण्यामध्ये दहा घरफोडी केल्याचे उघडकीस आले असून, पुणे पोलिसांनी लक्ष्मीला पाटण येथून ताब्यात घेतले. तिच्याकडून तब्बल ११ लाखांचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत.
पुणे येथील चतृश्रृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अनेक घरफोड्या झाल्या होत्या. या सर्व घरफोड्या लक्ष्मीने केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र लक्ष्मी ही
काही दिवसांपूर्वी पाटण येथील नाढे गावी गेल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर पुणे पोलिसांनी एक टीम तयार करून पाटण येथे तिला पकडण्यासाठी पाठविली. या टीमने लक्ष्मीला नाढे येथून ताब्यात
घेतले. त्यानंतर तिला पुणे येथे नेण्यात आले.
चतृश्रृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये तिने एकूण दहा घरफोड्या केल्याचे कबूल केले. तिच्याकडून ३२३ ग्रॅम सोन्याचे दागिने व ५०० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा सुमारे ११ लाख १७ हजार ५०० रुपयांचा
ऐवज पोलिसांनी जप्त केला
आहे.
लक्ष्मीकडून आणखी काही बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पुणे पोलिसाकडून वर्तवण्यात आली आहे. (प्रतिनिधी)