वंचित जातीत संघर्ष नको; सरसकट ओबीसी आरक्षण देणे शक्य नाही - भारत पाटणकर 

By नितीन काळेल | Published: November 9, 2023 03:55 PM2023-11-09T15:55:57+5:302023-11-09T15:57:00+5:30

जातीयवादी धर्मांधशक्तीच शत्रू 

Don struggle in deprived caste; Outright OBC reservation not possible says Bharat Patankar | वंचित जातीत संघर्ष नको; सरसकट ओबीसी आरक्षण देणे शक्य नाही - भारत पाटणकर 

वंचित जातीत संघर्ष नको; सरसकट ओबीसी आरक्षण देणे शक्य नाही - भारत पाटणकर 

सातारा : आरक्षण गरीब-श्रीमंतीचा मुद्दा नाही. तर जातीय शोषणाचा प्रश्न आहे. त्यामुळे आरक्षणाच्या प्रश्नावर वंचित जातींत संघर्ष होणे दुःखद बाब आहे. कारण सर्व शोषित जातींचा खरा शत्रू जातीयवादी धर्मांध शक्तीच आहे. त्यातच आता १९८१ पासून कुणबी नोंद असणाऱ्यांनाच प्रमाणपत्र देण्याचा मुद्दा स्पष्ट झाला असल्याने बाहेरील कोणीही ओबीसीत घुसडण्याचा प्रश्नच येणार नाही. तसेच सरसकट ओबीसी आरक्षण देणेही शक्य नाही, असे श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डाॅ. भारत पाटणकर यांनी स्पष्ट केले.

सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत डाॅ. पाटणकर बोलत होते. यावेळी विजय मांडके उपस्थित होते. डाॅ. पाटणकर म्हणाले, ‘महात्मा फुले यांनी तीन प्रकारात कुणबी विभागले जातात असे म्हटले आहे. कोरडवाहू शेती करणारे कुणबी, बागायत शेती करणारे ते माळी कुणबी आणि शेती तसेच मेंढपाळी करणारे धनगर कुणबी होय. तर १८८१ च्या जनगणनेचा उल्लेख करीत १८८४ च्या मुंबई प्रेसिडेन्सीच्या गॅजेट्समध्ये प्रत्येक जिल्ह्याची जातवार विभागणी दिली आहे. त्यात काही ठिकाणी मराठा आणि कुणबी यांची वेगळी लोकसंख्या दिली आहे. तर सातारा जिल्ह्यात कुणबी जातीची संख्या दिली. पण, मराठा घटकाची संख्या वेगळी दिलेलीच नाही. मात्र, सर्वच गॅझेटसमध्ये (हैद्राबाद धरून) इतर सर्व जातींची संख्या नोंदलेली आहे. 

आज उच्चजातीय ९६ कुळी मराठा जातीचे म्हणवणाऱ्यांनी कुणबी नसल्याचे जाहीर केले आहे. तसेच कुणबी आरक्षणाला नकार दिलाय. रत्नागिरी जिल्ह्यातीलही उच्चजातीय ९६ कुळी मराठा व्यक्तींनी एकत्र येऊन तसा ठरावच केला आहे. सातारा जिल्ह्यातील उच्चजातीय ९६ कुळी मराठा यांनीही मुख्यमंत्र्यांना याच प्रकारे स्पष्ट केले आहे. त्यामुळे जे पूर्वीपासून (१८८१ ) कुणबी आहेत. त्यांचेच रेकॉर्ड शोधून तेवढ्यांनाच कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मुद्दा स्पष्ट झाला आहे. त्यामुळे मराठा म्हणवणाऱ्यांना ओबीसीमधून आरक्षण नकोच आहे. मराठा म्हणवणाऱ्यांचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयातूनच ठरणार आहे.

कुणबी जात म्हणून नोंद पूर्वीपासूनच्या दप्तरात नाहीत. त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही. त्यामुळे बाहेरचे कोणी ओबीसीमध्ये घुसडण्याचा प्रश्न येणारच नाही, असे सांगून डाॅ. भारत पाटणकर पुढे म्हणाले, ‘सर्व जिल्ह्यांतील कुणबी शोध पडताळणी संपली की हा प्रश्न संपुष्टात येणार आहे. त्यामुळे आंदोलन फक्त उच्च जातीय ९६ कुळी मराठा समाज यांच्या पुरते आणि न्यायालयात लढण्याचेच शिल्लक राहू शकते. या कारणाने ओबीसी जातींनी आज तरी संघर्ष करण्याचा मुद्दा उरलेला नाही. मराठा उच्चजातीयांनी आता ओबीसीमधे समाविष्ट करण्याची मागणी न करता ५० टक्क्यांबाहेर मराठा विशेष आरक्षण देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे ओबीसी बांधवांना आता संघर्ष करण्याचे कारण उरलेले नाही. कुणबी नसलेली एकही व्यक्ती आता आरक्षणात घुसण्याचा प्रश्नच निकालात निघालेला आहे.

पत्रकार परिषदेत दिलेली १९८१ च्या जणगणनेनुसार जातनिहाय लोकसंख्येची माहिती.

सातारा जिल्हा
कुणबी ५,८३,५६९
माळी २४,५३९
धनगर ४१,५४७

सोलापूर
मराठा-कुणबी १,८००००
माळी २,४००
धनगर ५७,७०४

कोल्हापूर
कुणबी २,९९,८७१
माळी १,४०७
मराठा ६२,२८७
धनगर ३८,३२६

Web Title: Don struggle in deprived caste; Outright OBC reservation not possible says Bharat Patankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.