निरोगी आरोग्यासाठी निसर्गाकडून मिळणार रानभाज्याचे दान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:48 AM2021-06-09T04:48:24+5:302021-06-09T04:48:24+5:30

पेट्री : दुर्गम, डोंगराळ भागातील कास परिसरासह आसपासच्या डोंगररांगात निसर्गाने दिलेले सर्वांत मोठे, आरोग्यदृष्टया उत्तम दान म्हणजे मान्सून सक्रिय ...

Donation of legumes from nature for good health | निरोगी आरोग्यासाठी निसर्गाकडून मिळणार रानभाज्याचे दान

निरोगी आरोग्यासाठी निसर्गाकडून मिळणार रानभाज्याचे दान

Next

पेट्री : दुर्गम, डोंगराळ भागातील कास परिसरासह आसपासच्या डोंगररांगात निसर्गाने दिलेले सर्वांत मोठे, आरोग्यदृष्टया उत्तम दान म्हणजे मान्सून सक्रिय होत असताना अनेक रानभाज्या उगवल्या आहेत. जुने, जाणकार, अनुभवी व्यक्ती रानोरानी या दुर्मीळ रानभाज्या शोधून आणत आहेत. रानभाज्यांचा समावेश ग्रामीण भागातील व्यक्तीच्या आहारात सर्रास होत असल्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होत आहे.

काही थंड, तर काही उष्णवर्गीय रानभाज्या परिसरात उपलब्ध होतात. भारंगीची भाजी विशेष आवडीने खातात. याच्या पानात लोहाचे प्रमाण जास्त असून, पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. कोवळी पाने शिजवून कुरडूची भाजी केली जाते. ही भाजी खोकला, कफ कमी करण्यासाठी गुणकारी असते. आळू, भारंगी, शेंडवल, आक्वल, भोकरी, तरळी, वाघचौवडा, अळंबी, मोरशेडा, कुरडू, रानआळू, आदींसारख्या गोड, आंबट, खारट चव असणाऱ्या नैसर्गिकरीत्या उगवलेल्या पौष्टिक, औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे रासायनिक खत नाही. त्यामुळे पावसाळा ऋतूत या भाज्यांचे सेवन केल्याने त्या शरीरास आरोग्यदृष्टया महत्त्वाच्या ठरतात.

पावसाळा सुरू झाला की साधारण जून महिन्यापासून या रानभाज्या निसर्गत: कास तसेच आसपासच्या डोंगराळ भागात उगवून येऊन दसरा, दिवाळीपर्यंत उपलब्ध असतात. जुने अनुभवी व्यक्ती या रानभाज्या डोंगरात जाऊन शोधून आणतात. कास परिसरासह आसपासच्या सर्व डोंगराळ भागात रानभाज्या मुबलक प्रमाणात उगवून येण्यास सुरुवात झाली आहे. रानभाज्यांचा समावेश आहारात येथील स्थानिक ग्रामस्थ करत असून, त्या रानभाज्यांचा मनमुराद आनंद लुटत आहेत. शहरी भागात अशा रानभाज्या खायला मिळणं फारच दुर्मीळ. या रानभाज्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावी परतलेल्या चाकरमान्यांसाठी पर्वणी ठरत आहे.

कोट

रानभाज्या आरोग्यास खूप फायदेशीर आहेत. रासायनिक खतांचा वापर केलेल्या विकतच्या भाज्या खाल्ल्याने शरीरास हानिकारक आहे. डोंगरातील शेंडवल, भारंगीसारख्या अनेक रानभाज्या आम्ही आवडीने खातो.

- गणेश गोरे,

सह्याद्रीनगर, ता. जावळी

चौकट :

खताविना उगवतात भाज्या

कोणत्याही खताविना उगवून आलेल्या रानभाज्या पावसाळ्यात पर्वणी असते. चवदार, पौष्टिक, औषधी गुणधर्म असणाऱ्या रानभाज्या परिसरात मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात. परंतु, एकसारख्या दिसणाऱ्या काही वनस्पती विषारीही असू शकतात. म्हणून जुन्या, जाणकार, अनुभवी व्यक्तीच या रानभाज्या शोधून आणतात. या रानभाज्यांची भाजी कशा पद्धतीने करायची याची माहितीदेखील इतरांना देतात.

फोटो ०८कास

कास परिसरातील डोंगररांगांमध्ये दुर्मीळ भाज्या उगवत असून, त्या शरीरासाठी पौष्टिक समजल्या जातात. (छाया : सागर चव्हाण)

Web Title: Donation of legumes from nature for good health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.