निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान, पालकर दाम्पत्याचे सामाजिक दातृत्व

By नितीन काळेल | Published: December 4, 2023 09:00 PM2023-12-04T21:00:21+5:302023-12-04T21:00:29+5:30

संबंधित जागेवर सुसज्ज इमारत अन् रुग्णांवर उपचार

Donation of an acre of land for Nimbhore Health Centre, Palkar couple's social philanthropy | निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान, पालकर दाम्पत्याचे सामाजिक दातृत्व

निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान, पालकर दाम्पत्याचे सामाजिक दातृत्व

सातारा: जिल्ह्यात नवीन मंजूर झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना जागा मिळविण्याचे प्रयत्न सुरू असून निंभोरे केंद्राला निमा पालकर आणि रमेश पालकर या दाम्पत्याने एक एकर जागा दान केली आहे. यामुळे संबंधित जागेवर सुसज्ज इमारत उभी राहून रुग्णांना उपचार मिळणार आहेत. तर पालकर दाम्पत्याच्या सामाजिक दातृत्वाचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काैतुक करत सत्कारही केला.

सातारा जिल्ह्यात सध्या ८४ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ४१५ उपकेंद्रे कार्यान्वीत आहेत. तर २०१३ च्या शासन आदेशाने जिल्ह्यात नवीन २८ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ६० उपकेंद्रे नव्याने मंजूर झालेली. त्यामधील २० प्राथमिक आणि ३१ उपकेंद्रांना जागा प्राप्त झाली होती. यासाठी प्रामुख्याने शासनाकडील जमिनी हस्तांतरित करण्यात आलेल्या. तर जिल्ह्यात ८ प्राथमिक आणि २९ उपकेंद्रांना जागा मिळण्यासाठी जिल्हा तसेच तालुकास्तरावरुन पाठपुरावा सुरू आहे. गावपातळीवर जागा बक्षीसपत्र करुन देण्यासाठीही स्थानिक लोकप्रतिनिधींना आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार फलटण तालुक्यातील निंभोरे प्राथमिक आरोग्य केंद्रास जागा मिळालेली आहे.

निंभोरे येथील नीमा पालकर आणि रमेश दामोदर पालकर या दाम्पत्याने ग्रामीण भागातील जनतेस आरोग्यसेवा तत्काळ उपलब्ध होण्यासाठी नावावरील ४० गुंठे जागा सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावावर करुन दिली आहे. यामुळे संबंधित जागेवर प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत उभी राहणार आहे. तसेच काही महिन्यांतच रुग्णांवरही उपचार सुरू होणार आहेत.

निंभोरे येथील पालकर दाम्पत्याने दातृत्व दाखविल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी काैतुक केले. तसेच जिल्हा परिषदेत दोघांचाही सत्कर केला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संतोष हराळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. प्रमोद शिर्के आदी उपस्थित होते.

निंभोरे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी पालकर दाम्पत्याने जागा दिली आहे. बांधकामासाठी जागा दान करणे ही अत्यंत गाैरवास्पद बाब आहे. कारण, या जागेवर रुग्णांसाठी इमारत उभी राहून उपचार केले जाणार आहेत. अशा दानशूर व्यक्तीचे जिल्हा परिषद तसेच निंभोरे ग्रामस्थ कायमच ऋणी राहतील. अशाचप्रकारे इतरही आरोग्य विभागाच्या प्राथमिक आणि उपकेंद्रांनाही जागा उपलब्ध होण्यासाठी योगदान देण्याची गरज आहे.- ज्ञानेश्वर खिलारी, मुख्य कार्यकारी अधिकारी

 

 

 

Web Title: Donation of an acre of land for Nimbhore Health Centre, Palkar couple's social philanthropy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.