सांस्कृतिक कार्यक्रमातून सव्वा लाखाची देणगी
By admin | Published: April 19, 2017 03:02 PM2017-04-19T15:02:08+5:302017-04-19T15:02:08+5:30
म्हावशी प्राथमिक शाळेच्या विकासासाठी मोठी मदत होणार
आॅनलाईन लोकमत
खंडाळा (जि. सातारा), दि. १९ : प्राथमिक शाळांच्या भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी शिक्षकांची कायम धडपड सुरू असते. सध्या गावोगावच्या यात्रांचा काळ चालू आहे. या यात्रांमधून मनोरंजनाचा कार्यक्रम म्हणून शालेय विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. अशातूनच म्हावशी येथील शाळेला सांस्कृतिक कार्यक्रमातून चक्क सव्वा लाखाची बक्षीस रुपाने देणगी मिळाली आहे. त्यामुळे शाळेचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होणार आहे.
म्हावशी, ता. खंडाळा येथील प्राथमिक शाळेने वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम गावच्या यात्रेनिमित आयोजित केला होता. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या बहारदार गीतांवरील बालकलाकारांच्या नृत्याविष्काराने उपस्थित ग्रामस्थांची मने जिंकली. आपल्याच मुलांचे कौतुक करताना ग्रामस्थांनी ही तब्बल १ लाख २७ हजार रुपयांचे बक्षीस देत मुलांवर कौतुकाचा वर्षाव केला. तालुक्यात आजपर्यंतच्या कार्यक्रमात म्हावशी शाळेने उच्चांक प्रस्थापित केला आहे. मिळालेल्या या मदतीतून शाळेच्या भौतिक गरजा पूर्ण करणे सहज शक्य होणार आहे.
शाळेने घेतलेल्या पोवाडे गायन, किल्ले स्पर्धा, हस्ताक्षर, चित्रकला, स्पेलिंग पाठांतर अशा विविध स्पर्धांचा बक्षिस वितरण समारंभ घेण्यात आला. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी गजानन आडे, सरपंच स्वाती माळी, उपसरपंच विठ्ठल राऊत आदी प्रमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी)