हजार मूर्तींचे दान; दहा टन निर्माल्याचे विसर्जन

By admin | Published: September 23, 2015 10:17 PM2015-09-23T22:17:40+5:302015-09-24T00:09:21+5:30

पालिका, ‘एन्व्हायरो’चा उपक्रम : ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Donations of thousands of idols; Ten tons of immersion made | हजार मूर्तींचे दान; दहा टन निर्माल्याचे विसर्जन

हजार मूर्तींचे दान; दहा टन निर्माल्याचे विसर्जन

Next

कऱ्हाड : शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा होत आहे. या उत्सवाला कोठेही गालबोट न लागता उत्सव सुरळीत पार पडावा, यासाठी पोलीस प्रशासन व एन्व्हायरो नेचर क्लब, तसेच ‘लोकमत’ने केलेल्या आवाहनाला शहरातील नागरिकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. शहरात तीन ठिकाणी ठेवण्यात आलेल्या जलकुंडात सुमारे एक हजाराहून अधिक गणेशमूर्तींचे विसर्जन झाले असून तीन टनांहून अधिक निर्माल्याचे दान करत नागरिकांनी ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव’ या उपक्रमास प्रतिसाद दिल्याचे चित्र आहे. पालिकेने प्रीतिसंगम याठिकाणी ठेवलेल्या निर्माल्य कलशात निर्माल्य टाकून तसेच निर्माल्यकुंडात मूर्ती विसर्जित करून लोकांकडून या उपक्रमाचे कौतुकही केले जात आहे. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास कऱ्हाडला अनेक धार्मिक, ऐतिहासिक अशी पर्यटनस्थळे आहेत. त्यामुळे दररोज हजारो संख्येने नागरिक, पर्यटक भेट देण्यासाठी येथे येतात. कृष्णा कोयना नदीचा प्रीतिसंगम असणारे स्थळ म्हणजे कऱ्हाडचे वैभवच आहे. कऱ्हाड शहरासह तालुक्यातील अनेक गणेश मंडळाचे कार्यकर्ते गणेशमूर्ती विसर्जनासाठी येथे येतात. सोमवारपासून कापिल गोळेश्वर, सैदापूर, मलकापूर, कार्वेनाका, आगाशिवनगर या परिसरातील अनेक लोेकांनी गणेशमूर्तींचे विसर्जन केले. गणेश विसर्जनाची तारांबळ पाहता या ठिकाणी निवासी नायब तहसीलदार बी. एम. गायकवाड, मुख्याधिकारी प्रशांत रोडे यांनी भेट देत येथील परिसराची पाहणी केली. या परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
येथील कृष्णा नदीपात्रात दरवर्षी मोठ्या प्रमाणात गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. विसर्जनानंतर नदीचे प्रदूषण होते. ते होऊ नये यासाठी पालिका प्रशासन व एन्व्हायरो नेचर क्लब गेल्या काही वर्षे परिश्रम घेत आहे. या परिसरात पालिकेतर्फे एक ट्रक्टर व एन्व्हायरो नेचर फ्रेंडस क्लबतर्फे एक ट्रॅक्टर व नगरसेवक विक्रम पावसकर यांच्या वतीने निर्माल्यकलश ठेवण्यात आला आहे. त्यामध्ये नागरिकांनी घरातून आणलेले निर्माल्य हे कुंडात टाकून सहकार्य केले. शहरातील तीन ठिकाणी ठेवण्यात आलेल्या जलकुंडात आठशे गणेशमूर्तींचे विसर्जन लोकांनी केले. तसेच पाच ठिकाणी निर्माल्य कलशातून एका दिवसात तब्बल दहा टन निर्माल्य एकत्रित करण्यात आले.
यंदाच्या वर्षी प्रशासनाबरोबर सामाजिक संघटना, सार्वजनिक गणेश मंडळांनीही प्रदूषणाबाबत खबरदारी घेत अभिनव उपक्रम राबविले असल्याने त्यास यश मिळत असल्याचे दिसून येत आहे. त्यामध्ये येथील एन्व्हायरो नेचर फ्रेंडस क्लबचे अध्यक्ष जालिंदर काशिद, चंद्रकांत जाधव, अ‍ॅड. संभाजीराव मोहिते तसेच नगरसेवक विक्रम पावसकर मित्र मंडळ व सोमवार पेठेतील श्रीकृष्ण गजानन मंडळ ट्रस्टतर्फे गणेशविसर्जनादरम्यान उत्तमप्रकारे काम पाहत निर्माल्य संकलन कलश संकल्पना राबवण्यात आली. त्यातून दहा टन निर्माल्य गोळा झाले.
सामाजिक संघटना व पोलीस यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे गणेशोत्सवाचा आनंद लोकांना घेता येत आहे. यंदाचा गणेशोत्सव हा खरोखरच एक पर्यावरणपूरक गणेशोत्सव ठरत असल्याने नागरिकांकडूनही प्रशासनाचे व सामाजिक संघटनेस सहकार्य केले जात आहे. (प्रतिनिधी)


तीन ठिकाणच्या जलकुंडात ८०० गणेशमूर्तींचे विसर्जन
पालिका व एन्व्हायरो नेचर क्लबतर्फे शहरातील घरगुती गणेशमूर्ती व मंडळांतील लहान मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी शहरातील तीन ठिकाणी जलकुंड ठेवण्यात आले होते. त्यामध्ये कोयनेश्वर मंदिर परिसरातून ७८, शिवाजी हौसिंग सोसायटी येथून १३४ व कृष्णाघाट येथून ५२५ गणेशमूर्ती अशा ८०० हून अधिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे. या ठिकाणी बांधण्यात आलेल्या जलकुंडात नागरिकांनी आपल्या गणेशमूर्ती विसर्जित करून पालिका व एन्व्हायरो नेचर क्लबतर्फे करण्यात आलेल्या आवाहनास प्रतिसाद दिला आहे.

Web Title: Donations of thousands of idols; Ten tons of immersion made

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.