भीती नको दक्षता पाळा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:39 AM2021-01-20T04:39:18+5:302021-01-20T04:39:18+5:30
सातारा : बर्ड फ्लू या आजारामुळे आता आणखी वेगळी भीती लोकांच्या मनात घोंगावत आहे. नागरिकांनी भीती बाळगण्याऐवजी जर दक्षता ...
सातारा : बर्ड फ्लू या आजारामुळे आता आणखी वेगळी भीती लोकांच्या मनात घोंगावत आहे. नागरिकांनी भीती बाळगण्याऐवजी जर दक्षता पाळली तर हा आजार पसरु शकणार नाही, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
पक्ष्यांचा मृत्यू होत असेल तर प्रशासनाला द्या माहिती, बर्ड फ्लूची लक्षणे आढळल्यास नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात कळवा, रोजच्या आठवडी बाजारात विशेष सर्वेक्षण मोहीम राबवावी, संशयित क्षेत्रावरून पक्ष्यांची वाहतूक पूर्ण बंद करावी, उघड्या कत्तलखान्यात जैवसुरक्षा यंत्रणा सक्षम करावी, रोजची स्वच्छता व निर्जंतुकीकरण करावे, या रोगाचे जंतू डुकरांमध्ये किंवा डुकरांमधून संक्रमित होणार नाहीत, याची काळजी घ्यावी, देशभरातील सर्व पोल्ट्री फार्मनी पक्ष्यांच्या आरोग्यासाठी मूलभूत स्वच्छताविषयक अटींचे पालन करणे गरजेचे आहे. रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वव्यापी जैवसुरक्षा कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे, रोगांचे सर्वेक्षण करणे, फार्मवरील नियमित कामाचे मूल्यमापन करणे, बर्ड फ्लूसारख्या रोगांच्या यापूर्वी झालेल्या प्रादुर्भावापासून बोध घेऊन यापुढे अशा प्रकारच्या आपत्ती उद्भवणार नाहीत, याकरिता चोख जैवसुरक्षा प्लॅनची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. असे प्रशासनाने कळवले आहे.
हे करा..
स्थलांतरित पक्षी, वन्यपक्षी, कावळे यामध्ये मृत आढळल्यास फार्मवर त्यांचे शवविच्छेदन करू नये.
विभागीय, राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय प्रयोगशाळेत त्वरित त्याची सूचना द्यावी.
प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीने औषध फवारणी करावी.
रोगाची माहिती होण्यासाठी माहिती प्रशिक्षण व संपर्क शिबिर घ्यावे.
दक्षता पथकांना प्रशिक्षण देण्यात यावे.
हे टाळा
प्रादुर्भाव झालेल्या ठिकाणावरून पक्ष्यांची ने-आण टाळा.
रोगांचे जंतू डुकरांच्या माध्यमातून पसरणार नाहीत, याची काळजी घ्या.
स्थलांतरित पक्ष्यांच्या संपर्कात येऊ नका.