सज्जनगडावर भाविकांची मांदियाळी नकोच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:59 AM2021-02-23T04:59:10+5:302021-02-23T04:59:10+5:30
परळी : सज्जनगडावर होणारा दासनवमी महोत्सव येत्या २८ फेब्रुवारीला सुरू होत असून, या उत्सवाची सांगता ७ मार्चला होत ...
परळी : सज्जनगडावर होणारा दासनवमी महोत्सव येत्या २८ फेब्रुवारीला सुरू होत असून, या उत्सवाची सांगता ७ मार्चला होत आहे. गडावर राज्याच्या कानाकोपऱ्यातून महंत, मठपती येत असतात. ९ दिवस गडावर संगीत महोत्सव तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते, मात्र यावर्षी हे सर्व कार्यक्रम रद्द करण्याच्या सूचना ग्रामपंचायत परळी, रामदासस्वामी संस्थन, समर्थ सेवा मंडळ यांना दिल्या आहेत, अशी माहिती तहसीलदार आशा होळकर यांनी दिली.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, रुग्णसंख्या वाढत असल्याने सज्जनगडावर कलम १४४ लागू करण्यात आहे. गडावरील सर्व धार्मिक विधी साधेपणाने व मोजकेच मानकरी घेऊन पूर्ण करावयाचे आहेत. या कालखंडात भाविकांना तसेच स्थानिकांना रहिवाशांसाठी तंबू उभारता येणार नाहीत. खाद्यपदार्थ, शीतपेय विक्रीस बंदी घालण्यात आली आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.
या कालावधीत बाहेरील यात्रेकरू, मानकरी, दिंड्या, सासनकाठ्या, पालखी यांना सज्जनगड व गावच्या हद्दीत प्रवेश करण्यास सक्त मनाई करण्यात आली असून, धार्मिक विधी झाल्यानंतर दर्शनासाठी मंदिर बंद ठेवण्यात यावे. धार्मिक विधी ठिकाण सोडून मंदिर परिसरात पाचपेक्षा जास्त लोक एकत्रित येणार नाहीत, याची काळजी ट्रस्टने घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोट..
सज्जनगडावरील धार्मिक विधी वेबसाइटवर यू ट्यूबवर
दासनवमी महोत्सवास सर्व धार्मिक विधी अधिकृत वेबसाइटवर यू ट्यूबवर पाहता येतील गडावरील कोणतीही धार्मिक परंपरा खंडित होणार नाही, अशी माहिती समर्थ रामदासस्वामी संस्थानचे अध्यक्ष सु. ग. स्वामी व समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाह योगेशबुवा रामदासी यांनी दिली.
ग्रामपंचायत सतर्क
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने यंदाचा दासनवमी महोत्सव सध्या पद्धतीने साजरा होत आहे. गडावरील दोन्ही संस्था तसेच आरोग्य विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोणीही नियमांचे उल्लंघन करू नये
- बाळासाहेब जाधव, सरपंच, परळी