थकीत बिलासाठी वीज कनेक्शन तोडू नका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:26 AM2021-07-02T04:26:13+5:302021-07-02T04:26:13+5:30
कऱ्हाड : कोरोनामुळे प्रत्येकजण आर्थिक संकटात आहे. त्यामुळे थकीत बिलासाठी वीज कनेक्शन तोडू नये. ग्राहकांना वीजबिल भरण्यासाठी मुदत द्यावी, ...
कऱ्हाड : कोरोनामुळे प्रत्येकजण आर्थिक संकटात आहे. त्यामुळे थकीत बिलासाठी वीज कनेक्शन तोडू नये. ग्राहकांना वीजबिल भरण्यासाठी मुदत द्यावी, अशी मागणी भीम आर्मीच्यावतीने करण्यात आली आहे. त्याबाबतचे निवेदन कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले.
यावेळी भीम आर्मीचे कऱ्हाड तालुकाध्यक्ष अनिकेत साळुंखे, शुभम पवार, शंतनू कुकडे, राहुल साळुंखे आदी उपस्थित होते. या निवेदनात म्हटले आहे की, गत दोन वर्षांपासून कोरोना महामारीचे संकट आहे. समाजातील प्रत्येक घटक या संकटाशी लढत आहे. संक्रमण रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यातच लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे गतवर्षी आणि यंदाही व्यापारी, व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. काहींचे व्यवसाय कायमचे बंद पडले. शेतकऱ्यांनाही या लॉकडाऊनचा मोठा फटका बसला. शेतकऱ्यांचा शेतीमाल शेतामध्ये पडून राहिल्यामुळे आर्थिक नुकसान झाले. मात्र, तरीही प्रत्येकजण या संकटातून मार्ग काढत आपली परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करत आहे.
गतवर्षापासून अनेकांची वीजबिले थकीत आहेत. सुरूवातीला ही बिले माफ केली जातील, असे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर त्यातून माघार घेत बिले भरावीच लागतील, असे सांगण्यात आले. त्यातही वाढीव मुदत देण्यात आली नाही. वीज कंपनीनेही वसुलीसाठी कनेक्शन तोडण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. कोरोना आणि लॉकडाऊनचा विचार करून वीज कंपनीने थकीत बिलापोटी ग्राहकांची कनेक्शन न तोडता बिले भरण्यासाठी सवलत द्यावी. तसेच टप्प्याटप्प्याने रक्कम स्वीकारावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.