"एका निकालाने देशाचा अंदाज बांधू नका", भाजपाचे उदाहरण देत एकनाथ शिंदेंनी मांडली बाजू
By प्रमोद सुकरे | Published: May 13, 2023 11:50 PM2023-05-13T23:50:00+5:302023-05-13T23:50:01+5:30
कर्नाटकच्या निकालाचा परिणाम महाराष्ट्रात होणार नाही!
प्रमोद सुकरे, लोकमत न्यूज नेटवर्क, कराड: विधानसभा निवडणुकीत कर्नाटकमध्ये मतदारांनी दिलेला कौल काँग्रेसच्या बाजूने दिला आहे. परंतु, एखाद्या राज्याच्या निकालावरून आपण महाराष्ट्रसह देशाचा अंदाज बांधू शकत नाही. भाजपला २०१९ पूर्वी झालेल्या विधानसभेसह व लोकसभेच्या पोटनिवडणुकीत विजय मिळाला नव्हता. परंतु त्यानंतर नरेंद्र मोदींनी देशात सत्ता मिळवली. त्यामुळे कर्नाटकच्या निकालावरून महाराष्ट्रसह देशाचा अंदाज बांधता येऊ शकत नाही, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. दौलतनगर (मरळी), ता. पाटण येथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पालकमंत्री शंभूराजे देसाई, उद्योगमंत्री उदय सामंत यांची उपस्थिती होती.
फोडाफोडीचे सरकार लोक मानत नाहीत, या शरद पवार यांच्या वक्तव्याबाबत छेडले असता मुख्यमंत्री म्हणाले, देशात राहुल गांधींची भारत जोडो का तोडो यात्रा सुरू असतानाही मेघालय, त्रिपुरा आणि नागालँडमधील निवडणूका भाजपने जिंकल्या आहेत. त्या-त्या राज्यातील काही स्थानिक प्रश्न असतात. त्यामुळे कर्नाटकच्या निकालाचा संपूर्ण देशावर परिणाम होईल, असे अनुमान कोणी काढू नये. ते स्वतःचीच पाठ थोपटून घेण्यासारखे होईल.
ते म्हणाले, कर्नाटकच्या निकालाचा महाराष्ट्रावर अजिबात परिणाम होणार नाही. अडीच वर्षात घरात बसून कोमात गेलेले सरकार लोकांनी पाहिले आहे. तर आमचे दहा महिन्याच्या सरकारचे काम जोमात सुरू आहे. हा फरक जनतेला कळतो. राज्यातील जनतेला काम करणारे सरकार पाहिजे आहे.घरी बसणारे नको आहेत येत्या निवडणुकीत काम करणाऱ्या सरकारच्या पाठीशी जनता ठामपणे उभी राहील.
आपलं घर जळतयं ते बघा...
उद्धव ठाकरे यांनी कर्नाटकचा विजय हा मोदी आणि शहांच्या हुकूमशाहीचा पराभव असल्याचे म्हटले आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, कोणाचा पराभव झाला आणि कोणाचा विजय झाला, हे सर्वांना माहिती आहे. आपलं घर जळतयं ते विझवायचे सोडून दुसऱ्याचे घर जळताना पाहून असुरी आनंद घेणारे काही लोक आहेत. त्यामुळे 'बेगानी शादीमे अब्दुल्ला दिवाना' या म्हणीप्रमाणे त्यांची अवस्था असून त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार, अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरे यांना फटकारले.