शंभूराज देसाई व माझ्यात गैरसमज पसरवू नका, उदयनराजेंनी स्पष्टच सांगितलं
By सचिन काकडे | Published: June 19, 2023 04:28 PM2023-06-19T16:28:34+5:302023-06-19T17:06:07+5:30
सरकार कोणाचे असू दे. आज या पक्षाचे उद्या त्या पक्षाचे. समीकरण नेहमीच बदलत असतात. हे कोणीही विसरू नये
सातारा : पालकमंत्री शंभूराज देसाई आणि आमचे सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळे ज्यांची उंची नाही, बौद्धिक पातळी नाही अशा व्यक्तींनी आमच्यात गैरसमज निर्माण करू नये. माझा कोणत्याही कामाला विरोध नाही; परंतु पोवई नाक्यावरील शिवतीर्थाचे पावित्र्य हे जपलेच पाहिजे, अशा शब्दांत खासदार उदयनराजे भोसले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
मंत्री शंभूराज देसाई यांनी पोवई नाका परिसरात माजी मंत्री बाळासाहेब देसाई यांच्या नावाने स्मारक उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रस्तावित स्मारकाला सातारकर नागरिक व शिवप्रेमींमधून तीव्र विरोध केला जात आहे. या पार्श्वभूमीवर खा. उदयनराजे यांनी सोमवारी जलमंदिर या निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधला. तसेच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, 'दिवंगत बाळासाहेब देसाई यांचे कार्य खूप मोठे आहे. आज यशवंतराव चव्हाण, किसन वीर यांचे स्मारक आहे. मग बाळासाहेब देसाई यांचे स्मारक का असू नये? या स्मारकाला विरोध करण्याचा प्रश्नच येत नाही. तरी देखील काही मंडळी माझा विरोध असल्याचे भासवत आहेत. पोवई नाक्यावरील शिवतीर्थाचे पावित्र्य जपणे गरजेचे आहे, ही जशी माझी भूमिका आहे तशीच ती पालकमंत्र्यांची देखील आहे.
पूर्वी परिस्थिती वेगळी होती. आता वेगळी आहे. पोवई नाक्यावर भुयारी मार्गाचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे इथली जमीन आतून पोकळ झालेली आहे. येथे कोणत्याही प्रकारचे काम करताना सर्व तांत्रिक बाबी विचारात घ्यायला हव्यात. शिवतीर्थ परिसर ऐतिहासिक असून तो तसाच राहावा, अशी सर्व शिवप्रेमींची भावना आहे. त्यामुळे हा परिसर अधिक सुशोभीत कसा करता येईल यासाठी प्रयत्न केले जातील.
जनतेला डावलता येत नाही..
'ज्या त्या मंत्र्यांना त्या-त्या मतदारसंघातील मतदारांनी निवडून दिले आहे. खासदार म्हणून सोडून द्या; परंतु एक व्यक्ती, एक नागरिक म्हणून आम्ही या सरकारचा भाग आहोत. सरकार कोणाचे असू दे. आज या पक्षाचे उद्या त्या पक्षाचे. समीकरण नेहमीच बदलत असतात. हे कोणीही विसरू नये. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही असं म्हटलं नाही की, हे शिवाजी महाराजांचे राज्य आहे. ते नेहमीच म्हणत असत हे रयतेचं राज्य आहे. त्यामुळे जनतेला डावलून कोणीही काहीही करू शकत नाही.