कंपनी उत्पादन नको, माणसांचे जीव वाचवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:38 AM2021-05-14T04:38:43+5:302021-05-14T04:38:43+5:30

खंडाळा : कोरोनाला आळा घालण्यासाठी जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊनचे आदेश लागू केले आहेत. लॉकडाऊन असल्यामुळे कोरोना संसर्गावर आळा घालणे सोयीस्कर ...

Don't want company products, save people's lives! | कंपनी उत्पादन नको, माणसांचे जीव वाचवा!

कंपनी उत्पादन नको, माणसांचे जीव वाचवा!

Next

खंडाळा : कोरोनाला आळा घालण्यासाठी जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊनचे आदेश लागू केले आहेत. लॉकडाऊन असल्यामुळे कोरोना संसर्गावर आळा घालणे सोयीस्कर ठरणार आहे. मात्र, खंडाळा तालुक्यातील औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांमधून अनेक रुग्ण आढळले आहेत. याच कंपन्यांच्या अनिर्बंधतेमुळे खंडाळा तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात तालुक्यातील कंपन्या बंद ठेवल्या तर कोरोनाचा विळखा सुटू शकतो. याबाबत तालुक्यातील जनतेने उठाव करूनही प्रशासनाने अद्याप निर्णय घेतला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने गर्दी टाळण्यासाठी आणि कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे सर्वस्वी अधिकार जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार सार्वत्रिक ठिकाणी एकत्र न येण्याचे आदेश दिले असल्याने सर्व बाजारपेठा बंद ठेवल्या आहेत. मात्र, अनेक कंपनीतील कामगार पॉझिटिव्ह होत असल्याने कोरोनाचा प्रसार वाढत आहे. त्यामुळे लोकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तालुक्यात रुग्णसंख्या एवढ्या पटीत वाढण्याचे कारण तालुक्यातील औद्योगिक वसाहत असल्याचे लोकांचे मत आहे. वास्तविक, खंडाळा तालुका पुण्यापासून जवळ आहे. तसेच तालुक्यातील शेकडो कंपनीत हजारो कामगार विदेशी आहेत. त्यामध्ये पुण्याहून येणारा कर्मचारी वर्ग मोठा आहे. तसेच गावोगावचे शेकडो तरुण या कंपन्यांमधून काम करतात. कंपनीतील कामगार एकमेकांच्या संपर्कात आल्याने जंतूसंसर्ग पसरतो आहे. अनेक कंपन्यांमध्ये सध्या रुग्ण आढळले आहेत. तेथे नियमाप्रमाणे त्यांची काळजी घेतली जात नाही. तरीही प्रशासनाकडून त्या बंद ठेवण्यात आल्या नाहीत. कंपनी प्रशासन उलट उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी कामगारांवर दबाव आणत असल्याचे अनेकांचे मत आहे. त्यामुळे कंपन्या सुरू ठेवण्याचा खेळ स्थानिक लोकांच्या अंगलट येत आहे.

चौकट..

वणवा भडकवू देऊ नका!

खंडाळा तालुक्यातील कंपन्यात पुण्याकडील कामगार वर्ग दररोज ये-जा करीत आहे. त्यांच्यावर कोणतेही निर्बंध नाहीत. त्यांच्या आरोग्याबाबत कंपनी प्रशासन विशेष खबरदारी घेत नाही. त्याचाच परिपाक रुग्णवाढीत होत आहे. त्यामुळे तालुक्याचे सार्वजनिक आरोग्य धोक्यात येत आहे. कोरोनाचा वणवा आणखी भडकू नये आणि जनजीवन विस्कळीत होऊ नये, यासाठी कंपन्यातील कामगारांची राहण्याची व्यवस्था स्वतंत्र करावी किंवा कंपन्या तूर्तास बंदच ठेवाव्यात, अशी मागणी जनतेमधून होत आहे.

(चौकट..)

तालुका टास्क फोर्स गरजेचा...

कोरोनाला आळा घालण्यासाठी राजकारण बाजूला ठेवून सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे काम करायला हवे. प्रशासनाच्या मदतीला पदाधिकारी धावले तरच हे शक्य आहे. गावोगावच्या लोकांनी उपचारासाठी बेड मिळावेत म्हणून कोणाकडे धाव घ्यावी. मुळातच या कामात अधिकारी, पदाधिकारी, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते यांचा समन्वय गरजेचा आहे. पण सध्यातरी तो दिसत नाही. यासाठी आमदारांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदारांनी तालुका टास्क फोर्स उभारणे आवश्यक आहे.

कोट..

सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत खंडाळ्यात आहे. यामधील मेडिकल प्रोडक्ट कंपन्या सोडल्या तर कामगारांच्या आरोग्याची काळजी इतर कंपन्यांमधून घेतली जात नाही. त्यामुळे सर्व कंपन्या सुरू असल्याने गावोगावचे कामगार लोक एकमेकांच्या सहवासात येत आहेत. खंडाळा तालुक्यात कोरोना विस्ताराचे मूळ कंपन्यांत बाहेरून येणारे कामगार आहेत. त्यामुळे कोरोनाच्या मुळावर घाव घालण्यासाठी काही दिवस कंपन्या बंद ठेवाव्यात.

-नितीन भरगुडे पाटील, माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद सातारा

Web Title: Don't want company products, save people's lives!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.