'तुम्ही, काळजी करू नका; मुंबईतलं सगळं नीटनेटकं करतो'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 05:10 PM2019-11-25T17:10:01+5:302019-11-25T17:52:46+5:30
जमिनीचे तुकडे होत चालल्याने शेतकऱ्यांच्या मुलांनी इतर व्यवसायाकडेही वळले पाहिजे.
कराड : तुम्ही उसाचं वजन कसं वाढंल, याची चर्चा करा. मुंबईत सध्या काय चाललंय, त्याची चर्चा करत बसू नका. मी ते सगळं नीटनेटकं करतो. त्याची काळजी करू नका. फक्त आमदार बाळासाहेब पाटील यांना तेवढं इथल्या जबाबदारीतून मुक्त करा, असे सांगत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकप्रकारे राज्यात आपलेच सरकार येणार, असा विश्वास व्यक्त केला. तर बाळासाहेब पाटील यांच्या मंत्रिपदाचे संकेतही त्यांनी दिले.
यशवंतनगर, ता. कराड येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचा ४६ वा गळीत हंगाम प्रारंभ शरद पवार यांच्या हस्ते सोमवारी पार पडला. यावेळी सह्याद्री कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटनही पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. खासदार श्रीनिवास पाटील अध्यक्षस्थानी होते. तर माजी सहकारमंत्री डॉ. एन. डी. पाटील यांची प्रमुख उपस्थित होती. शरद पवार म्हणाले, आपण शेतीकडे व्यवसाय म्हणून बघितले पाहिजे; पण आता शेतकऱ्यांच्या सगळ्याच पोरांनी शेती करण्याचे दिवस राहिलेले नाहीत. जमिनीचे तुकडे होत चालल्याने शेतकऱ्यांच्या मुलांनी इतर व्यवसायाकडेही वळले पाहिजे.
खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, सह्याद्रीवर येता घाला, सह्यगिरी हा धावून गेला हा यशवंतराव चव्हाणांचा इतिहास आहे. तोच कणखर बाणा आज शरद पवारांच्या रुपाने आपल्याला पाहायला मिळत आहे.
आमदार बाळासाहेब पाटील म्हणाले, आम्ही मंडळी दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने जाणारी आहोत. तो विचार पुढे नेण्याचे काम शरद पवार करीत आहेत. त्यामुळे आम्ही त्यांची साथ कदापि सोडणार नाही. आम्हालाही सत्तेची स्वप्ने दाखविली गेली होती; पण आम्ही विचारापासून ढळणार नाही.
कार्यक्रमाला आमदार मोहनराव कदम, प्रभाकर देशमुख, अरुण लाड, सत्यजित पाटणकर, राजेश पाटील-वाठारकर, नितीन पाटील, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष सुनील माने, रावसाहेब पाटील, नितीन पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी स्वागत केले. आमदार बाळासाहेब पाटील यांनी प्रास्ताविक केले.
बक्षीस घ्यायचा कंटाळा येत नाही का?
सह्याद्री सहकारी साखर कारखाना हा अतिशय उत्तम चाललेला कारखाना आहे. त्यामुळे प्रत्येकवर्षी त्याला शासनाचा कोणतातरी पुरस्कार मिळतच असतो. बऱ्याचदा वितरणाला मीच असतो. तेव्हा एकदा मी बाळासाहेबांना म्हटलं की, तुम्हाला बक्षीस घ्यायचा कंटाळा येत नाही का? जरा दुसऱ्यांना मिळू द्या, त्यावर एकच खसखस पिकली.