कोरोनामुक्त पाचगणीकरिता ‘डोअर टू डोअर’ तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:26 AM2021-06-10T04:26:27+5:302021-06-10T04:26:27+5:30
पाचगणी: कोरोना संसर्गाला रोखण्याकरिता पाचगणी नगर परिषद व आरोग्य विभाग पाचगणी यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात घरोघरी जाऊन स्वॅब तपासणी ...
पाचगणी: कोरोना संसर्गाला रोखण्याकरिता पाचगणी नगर परिषद व आरोग्य विभाग पाचगणी यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात घरोघरी जाऊन स्वॅब तपासणी करण्यात येत आहे. यामध्ये दोन दिवसात १६९ अँटिजन टेस्ट करण्यात आल्या असून, सर्व चाचण्या निगेटिव्ह आल्याने कोरोना संसर्ग हद्दपार होत असल्याने नागरिकांनी कोरोनामुक्त पाचगणीकरिता पुढे येत कोरोना टेस्ट करून घ्याव्यात, असे आवाहन परिषदेच्यावतीने करण्यात येत आहे.
पाचगणी शहरात प्रत्येक वॉर्ड अंतर्गत जाऊन अँटिजन टेस्ट करण्यात येत आहेत. हा उपक्रम पाचगणी नगरपरिषदेच्या व प्राथमिक आरोग्य केंद्र पाचगणी यांच्या संयुक्त विद्यमाने राबविला जात. याचे मुख्य उद्दिष्ट शहर कोरोनामुक्त करणे हा आहे. याकरिता मुख्याधिकारी गिरीश दापकेकर व डॉ. अजित कदम यांनी पुढाकार घेत शहर कोरोनामुक्त करण्याकरिता हा उपक्रम राबविला जात आहे.
शहरात मंगळवारपासून हे कोरोनामुक्त शहर हे अभियान राबविले जात आहे. त्याअंतर्गत प्रत्येक वॉर्डच्या ठिकाणी जाऊन कोरोना टेस्ट करण्यात येत आहेत. आतापर्यंत पॉवर हाऊस २०, आंबेडकर कॉलनी १२४, शाहूनगर १५ कोरोना चाचणी करण्यात आल्या असून, सर्व टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत.
कोरोना चाचणी करण्याकरिता आरोग्य विभागाची एक टीम असून, यामध्ये चेतन रांजणे, लॅब टेक्निशियन चांगदेव जाधव, आरोग्य सेवक, शीतल गावडे, अक्षया भिलारे, शेजल भिलारे, रूपाली दुनगव, शीतल रांजणे, आरोग्यसेविका तर नगर परिषदेच्या टीममध्ये अधिकारी रवींद्र कांबळे, सागर बगाडे, राहुल कदम, सागर मोरे, विशाल स्वामी, हे स्वॅब तपासणीच्या ठिकाणी लाऊडस्पीकरवरून अनाऊन्स करीत नागरिकांना चाचणी करण्यात सांगत आहेत.
कोट..
शहरातील नागरिकांना स्वॅब टेस्टिंग करून घ्यावे. कोरोना चाचणी टीमला सहकार्य करून कोरोनामुक्त शहर करण्यास प्राधान्य क्रम द्या.
-गिरीश दापकेकर, मुख्याधिकारी, पाचगणी