साताऱ्यात मध्यवस्तीत फ्लॅटमध्ये कुंटणखाना
By Admin | Published: January 15, 2016 12:57 AM2016-01-15T00:57:45+5:302016-01-15T00:58:08+5:30
पोलिसांचा छापा : बंगालच्या तीन मुलींची सुटका; एकास अटक
सातारा : शहराच्या मध्यवस्तीत सुरू असलेल्या हायप्रोफाइल कुंटणखान्याचा पोलिसांनी बुधवारी पर्दाफाश केला. बड्यांची हौस पुरविण्यासाठी फ्लॅटवर आणून ठेवलेल्या पश्चिम बंगालमधील तीन मुलींची पोलिसांनी सुटका केली असून, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. छाप्यावेळी त्यापैकी एकास अटक करण्यात आली.
सरिता बजरंग लाडी ही या सूत्रधार महिलेविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, ती फरारी आहे. तिचा सहकारी विशाल रंगनाथ आल्हाट (वय २३, रा. बेलदार गल्ली, अहमदनगर) याला अटक करण्यात आली आहे. हा हायप्रोफाइल वेश्याव्यवसाय जेथे सुरू होता, त्या फ्लॅटच्या मालकाविरुद्धही गुन्हा दाखल झाला असून, त्याचे नाव पोलिसांना निष्पन्न झालेले नाही. अनेक वर्षांपासून सरिता लाडी ही महिलांना पैशांचे आमिष दाखवून, वेळप्रसंगी दहशतीचा वापर करून वेश्याव्यवसायाविरुद्ध प्रवृत्त करीत असून, भरवस्तीत कुंटणखाना चालवीत आहे, अशा तक्रारी पोलिसांकडे येत होत्या, मात्र यावर कारवाई होत नव्हती. शेवटी याबाबत खात्री करून घेण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले होते.
त्यानुसार डॉ. देशमुख आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक पद्माकर घनवट यांनी कन्यासागर अपार्टमेन्टच्या फ्लॅट नं. पाच आणि आठ या दोन फ्लॅटवर बुधवारी छापा टाकला. पश्चिम बंगालमधून वेश्याव्यवसायासाठी सरिता लाडी हिने तीन मुलींना आणून ठेवले असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. छापा टाकला तेव्हा विशाल आल्हाट हा सरिता लाडीचा सहकारी आणि या तीन मुली या फ्लॅटमध्ये आढळून आल्या. कुंटणखाना चालविण्यास मदत केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याच्यासह सरिता आणि संबंधित फ्लॅटच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुटका करण्यात आलेल्या तीन मुलींना सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. छाप्याच्या कारवाईत पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, पृथ्वीराज घोरपडे, विजय शिर्के, संजय पवार, महिला हेडकॉन्स्टेबल राजेश्री भोसले, कॉन्स्टेबल तनुजा शेख, नूतन बोडरे, मोनाली निकम, अश्विनी घाडगे, वैशाली घाडगे, मंगल कांबळे, महेश शिंदे, योगेश पोळ यांनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)
े नागरिक त्रस्त
दुर्गा पेठेसारख्या शहराच्या मध्यवस्तीतील भागात कन्यासागर अपार्टमेन्ट या इमारतीमध्ये हा बेकायदा कुंटणखाना चालविला जात होता.
आजूबाजूच्या नागरिकांनी त्रस्त होऊन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना अनेक तक्रारी दिल्या होत्या.