जम्बो कोविडचा शेजार म्हणून उघडेना क्रीडा संकुलाचे द्वार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:41 AM2021-08-22T04:41:39+5:302021-08-22T04:41:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : दीड वर्षांहून अधिक कालावधीसाठी क्रीडांगणे आणि मैदाने बंद असल्याने मुलांचे खेळ आणि सराव थांबला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : दीड वर्षांहून अधिक कालावधीसाठी क्रीडांगणे आणि मैदाने बंद असल्याने मुलांचे खेळ आणि सराव थांबला आहे. अनलॉकमध्ये सर्व सुरळीत झाले तरीही जिल्हा क्रीडा संकुल कुलूपबंदच आहे. जम्बो कोविडचा शेजार असल्याने संकुल अद्यापही बंदच आहे. त्यामुळे खेळाडूंच्या क्रीडायुष्यावर परिणाम होऊ लागला आहे. सराव नसल्याने बहुतांश विद्यार्थ्यांनी कष्टाने मिळवलेली मानांकनातील आघाडीही आता पिछाडीवर पडली आहे.
मार्च २०२०मध्ये कोविडचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर जिल्ह्यातील सर्व क्रीडांगणे आणि क्रीडा संकुले बंद करण्यात आली. कोविडचा काळ सुरू असताना कबड्डी, व्हॉलिबॉल, लॉन टेनिस यासारखे खेळ ऑनलाईन खेळणं केवळ अशक्य आहे. त्यामुळे मुलांनी व्यायाम सुरू ठेवला, पण खेळाचा सराव नसल्याने त्यांची अडचण झाली. एकीकडे ऑक्टोबर महिन्यापासून विविध ठिकाणी सामने भरविण्याची तयारी सुरू आहे, तर दुसरीकडे साताऱ्यातील क्रीडा संकुल खुले न केल्याने टेबल टेनिस, लॉन टेनिस, बास्केटबॉल, कबड्डी यासारख्या खेळांचा सराव कधी होणार आणि स्पर्धेला कसे उतरणार, असा प्रश्न खेळाडूंच्या समोर आहे.
क्रीडा संकुल खुले करण्याबाबत शासकीय पातळीवरही उदासिनता पाहायला मिळते. जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून लवकरच निर्णय घेऊ, हे साचेबद्ध उत्तर दिले जात असल्याने येथे येणारे पालकही हतबल झाले आहेत.
शासकीय स्तरावर असलेल्या या उदासिनतेमुळे जिल्ह्यातील होतकरू विद्यार्थ्यांवर निव्वळ हातावर हात धरून बसायची वेळ आली आहे. त्यांच्या या नुकसानासाठी केवळ शासनच जबाबदार असल्याची खंत पालकांनी ‘लोकमत’कडे बोलून दाखवली. दरम्यान, याबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
वारंवार मैदाने बंद, कशी मिळणार पदकं?
कोविड प्रादुर्भावाच्या काळापूर्वीपासूनच विविध शासकीय कारणांनी क्रीडा संकुल अधिग्रहित करण्याचा पायंडा पाडण्यात आला आहे. निवडणुकांचे काम असो की सार्वजनिक कार्यक्रम संकुल दिलेच जाते. कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर जम्बो सेंटरमध्ये बेड रिकामे असूनही रुग्णांना संकुलात आणले जातेय. या पदावर असलेल्यांनाही संकुल खेळाडूंसाठी खुले करावे, याची ओढ दिसत नाही. खेळाला कायम दुय्यम स्थान देण्याची मानसिकता बदलत नसल्यानेच जागतिक पातळीवर चमकायला मर्यादा येत आहेत.
सोयीच्यांना मिळते आवश्यक सेवा
कोविडचे कारण सांगून क्रीडा संकुल बंद असले तरीही आपल्या नावाचा आणि पदाचा वापर करून कडक लॉकडाऊनमध्येही संकुलात खेळणारे महाभाग होते. मुलांच्या करिअरचा प्रश्न असतानाही केवळ वशिला कमी पडला म्हणूनच त्यांना सरावालाही संकुलात जाते आले नाही. कोविडचा तब्बल दीड वर्षांचा काळ या मुलांनी सरावाशिवाय फुका घालवला. त्यातही ज्या खेळांना मैदाने आणि अन्य सोयी लागतात त्यांचे तर चांगलेच हाल झाले आहेत. या खेळाडूंचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील मानांकनही चांगलेच घसरले आहे. याविषयी कोणा अधिकाऱ्याविरोधात बोललं तर त्याचा परिणाम थेट मुलांच्या खेळण्यावर होत असल्याचंही पालकांनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला सांगितले.
पॉईंटर
जिल्हा संकुलात खेळले जाणारे खेळ
बास्केटबॉल,
टेबल टेनिस,
व्हॉलिबॉल,
योगासन,
बॅडमिंटन,
स्केटिंग,
लॉन टेनिस,
स्वीमिंग,
जीम,
ओपन जीम,
बॉक्सिंग,
स्केटिंग,
फुटबॉल,
रग्बी,
क्रिकेट,
ॲथलेटिक्स
कोणावर होतोय परिणाम
पोलीस भरतीसाठी सराव करणारे
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेणारे
महागड्या फी भरून व्यायाम करू न शकणारे
नियमित व्यायाम करायला येणारे
संकुलातील
एकूण प्रशिक्षक : ४७
खेळाडूंची संख्या : १७५४