श्रावणात यंदाही मंदिरांचे द्वार बंदच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:28 AM2021-07-17T04:28:59+5:302021-07-17T04:28:59+5:30
सातारा : श्रावण महिना म्हटलं की, समोर येते निर्मळ वातावरण, पवित्र महिना आणि शिवभक्तांचा उत्साह. महादेवाला प्रिय असलेल्या या ...
सातारा : श्रावण महिना म्हटलं की, समोर येते निर्मळ वातावरण, पवित्र महिना आणि शिवभक्तांचा उत्साह. महादेवाला प्रिय असलेल्या या महिन्याला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. यंदा ९ ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होत आहे. ६ सप्टेंबरपर्यंत हा महिना असेल. परंतु यंदाही कोरोनाचे सावट असल्याने मंदिरे कुलूपबंद आहेत. त्यामुळे श्रावणात मंदिरात प्रवेश मिळणार की नाही? असा प्रश्न भाविकांना पडला आहे.
हिंदूंच्या धार्मिक सणांना श्रावण महिन्यापासून सुरुवात होते. तसेच हा महिना व्रतवैकल्यांसाठी पवित्र मानला जातो. त्यामुळे या महिन्यात बरीच व्रतवैकल्ये घरात व मंदिरांमध्ये केली जातात. यंदा ९ ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होत आहे. या महिन्यात एकूण पाच श्रावणी सोमवार आले आहेत. गेल्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने जिल्ह्यातील सर्वच मंदिरे बंद होती. त्यामुळे भाविकांना व्रतवैकल्ये करता आली नाहीत.
संपूर्ण श्रावण महिन्यात भाविकांनी पारायणाबरोबरच विविध पूजा घरीच केल्या. यंदाही काहीशी अशीच परिस्थिती असून, कोरोनामुळे मंदिरे बंद आहेत. त्यामुळे यंदा तरी मंदिरात प्रवेश मिळणार का, असा प्रश्न भाविकांना पडला आहे. असे असले तरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरू लागली आहे. येत्या काही दिवसांत रुग्ण संख्या आटोक्यात आल्यास मंदिरांचे द्वार उघडू शकते, अशी आशा भाविकांना आहे.
(चौकट)
९ ऑगस्टपासून श्रावण
यावर्षी ९ ऑगस्टपासून श्रावण महिन्याला प्रारंभ होत आहे. या महिन्यात श्री वरद शंकर व्रत पूजा, श्री सत्यनारायण, श्री सत्य अंबा, श्री सत्यदत्त अशा पूजा केल्या जातात. या महिन्यात प्रत्येक सोमवारी भाविकांकडून शिवपिंडीवर शिवामूठ अर्पण केले जाते. जिल्ह्यातील शंभू महादेव, श्री क्षेत्र महाबळेश्वर, यवतेश्वर, पाटेश्वर, कोटेश्वर अशी प्रमुख महादेव मंदिरे आहेत.
(कोट)
श्रावण महिन्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामुळे नारळ, बेल, फुले, केळी अशा साहित्याला मोठी मागणी असते. मात्र, गेल्या वर्षी कोरोनाचा फटका बसला आणि यावर्षीदेखील तशीच परिस्थिती आहे. मंदिरे खुली झाली तर आम्हाला थोडाफार दिलासा मिळेल.
- सदाशिव पवार, नारळ विक्रेता
(कोट)
आम्ही श्रावण महिन्यात वेगवेगळ्या फुलांची विक्री करतो. पूजेच्या साहित्यालादेखील मागणी असते. मात्र, कोरोनामुळे आमचा व्यवसाय बंद पडला. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा, मंदिरे खुली व्हावीत आणि आमचा व्यवसाय पुन्हा सुरू व्हावा, हीच आमची अपेक्षा आहे.
- सागर जाधव, फुल विक्रेता
(श्रावण सोमवार)
पहिला ९ ऑगस्ट
दुसरा १६ ऑगस्ट
तिसरा २३ ऑगस्ट
चौथा ३० सप्टेंबर
पाचवा ६ सप्टेंबर