शिपायाने कराची रक्कम उडवली मटका, जुगारात; साताऱ्यातील 'या' ग्रामपंचायतीच्या कारभारावर आक्षेप
By प्रगती पाटील | Published: September 30, 2023 07:32 PM2023-09-30T19:32:21+5:302023-09-30T19:35:22+5:30
दोषींवर कारवाई होण्यासाठी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन
सातारा : नवनवीन उपक्रमामुळे सातारा जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या जकातवाडी ग्रामपंचायतच्या कारभारावर आता शंका घेण्यात येऊ लागली आहे. ग्रामपंचायतकडे करापोटी जमा होणारा पैसा चक्क मटका व जुगारापोटी उडवल्याचा आरोप ग्रामपंचायतीच्या शिपायावर करण्यात आला आहे. या प्रकरणातील दोषींवर तातडीने कारवाई व्हावी या मागणीसाठी आरटीआय कार्यकर्ते महेश शिवदास यांनी उपोषणाचे शस्त्र उपसले आहे.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात शिवदास यांनी ग्रामपंचायतीच्या कारभारावर आक्षेप नोंदवले आहेत. निवेदनात म्हटले आहे की, 'जकातवाडी ता. सातारा येथील ग्रामपंचायत कर्मचारी यशवंत दळवी व संगणक चालक शुभांगी गुजर यांनी ग्रामपंचायतीच्या विविध करापोटी भरलेल्या रकम खात्यात न भरता ती स्वतः साठी वापरली. ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सुधीर कदम यांच्या सहमतीने हे केल्याचे निदर्शनास आले आहे.
शिपाई नारायण दळवी यांनी मटका व जुगारापोटी तर संगणक चालक गुजर यांनी ग्रामपंचायतीचे पैसे वैयक्तिक खरेदीसाठी वापरले आहेत. शासकीय नियमानुसार ग्रामपंचायतीला जमा होणारा भरणा सात दिवसात ग्रामपंचायतीच्या खात्यावर भरणे बंधनकारक असतो. या तिन्ही कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या खात्यावर हा भरणा उशिरा केला. तब्बल आठ ते नऊ महिने कराचे पैसे स्वतःकडे ठेवून शासनाची फसवणूक केल्याचेही निवेदनात म्हंटले आहे.
असा उघडकीस आला प्रकार
जकातवाडी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी काही महिन्यांपासून ग्रामस्थांचे काम ऐकणे जवळपास बंद केले होते. याविषयी सदस्यांनी चौकशी केल्यानंतर पगार न झाल्याने काम करत नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. सदस्यांनी चौकशी केली असता मार्च २०२२ पासून ग्रामपंचायतीच्या खात्यामध्ये वसूल झालेली कराची लाखो रुपयांची रक्कम खात्यावर भरली नसल्याचे समोर आले.
ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांकडून कर स्वरूपात जमा झालेली रक्कम चुकून भरायची राहून गेली. यातील काही रक्कम त्यांनी जुगारासाठी नव्हे तर कुटुंबियांच्या आजारपणासाठी वापरल्याचे स्पष्ट केले. वेळोवेळी सूचना दिल्यानंतर २५ सप्टेंबर रोजी सर्व रक्कम ग्रामपंचायतच्या बँक खात्यावर भरण्यात आली. - सुधीर कदम, ग्रामसेवक, जकातवाडी