डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश विद्यार्थी दिवस देशभर व्हावा : साताऱ्यातून चळवळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 12:22 AM2018-09-11T00:22:02+5:302018-09-11T00:22:47+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बालपण साताऱ्यात गेले. त्यांच्या शैक्षणिक प्रवासाचा खऱ्या अर्थाने प्रारंभ येथूनच झाला. ७ नोव्हेंबर १९०० रोजी त्यांनी साताऱ्यातील छत्रपती प्रतापसिंह महाराज हायस्कूलमध्ये पहिलीमध्ये इंग्रजी वर्गात प्रवेश घेतला.
सातारा : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बालपण साताऱ्यात गेले. त्यांच्या शैक्षणिक प्रवासाचा खऱ्या अर्थाने प्रारंभ येथूनच झाला. ७ नोव्हेंबर १९०० रोजी त्यांनी साताऱ्यातील छत्रपती प्रतापसिंह महाराज हायस्कूलमध्ये पहिलीमध्ये इंग्रजी वर्गात प्रवेश घेतला. हा शाळा प्रवेश दिन गेल्यावर्षीपासून राज्यभर विद्यार्थी दिवस म्हणून साजरा होऊ लागला. आत्ता हा दिवस देशभर साजरा व्हावा, यासाठी सामाजिक कार्यकर्ते अरुण जावळे यांनी दिल्लीत केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री रामदास आठवले यांच्याशी चर्चा केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांतून शासनस्तरावर साजरा व्हावा, यासाठी सामाजिक कार्यकर्ते अरुण जावळे पंधरा वर्षे राज्य सरकारकडे आग्रह धरत होते. त्याला गतवर्षी सरकारने विद्यार्थी दिवस घोषित केला.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या नावाने शिक्षक दिन व डॉ. अब्दुल कलाम यांच्या नावाने वाचक दिन देशभर साजरा केला जातो. त्याप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने संपूर्ण भारतात विद्यार्थी दिवस साजरा होणे आवश्यक आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकार्यातून हा निर्णय झाला पाहिजे, अशी विनंतीही आठवले यांच्याकडे अरुण जावळे यांनी केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शाळा प्रवेशाने छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल चर्चेत आले आहे. ही शाळा पाहावयास देशाच्या कानाकोपºयातून लोक येतात. या शाळेला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यात यावा. यासाठी मंत्रालयाकडे आग्रहही धरला आहे. मुंबई आणि नागपूरमध्ये काही मंत्र्यांशी यासंबंधाने महत्त्वपूर्ण चर्चाही झाली आहे. त्याअनुषंगाने आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ समिती स्थापन्यात आली आहे.
सिम्बॉल आॅफ नॉलेज
‘छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल हा ऐतिहासिक ठेवा आहे. तो जतन करणे आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या शाळेचे विद्यार्थी होत. त्यामुळे या शाळेला अनन्यसाधारण महत्त्व आहे, जगात आजपर्यंत सर्वात हुशार विद्यार्थी कोण होऊन गेले, यासंबंधीचे संशोधन झाले. इंग्लंड, अमेरिका येथील कोलंबिया, आॅक्सफर्ड अशा नामवंत विद्यापीठांनी यासाठी पुढाकार घेतला. हे संशोधन बरेच माहिने सुरू राहिले.
नामवंत विद्यापीठांमधील तज्ज्ञ यामध्ये सक्रियपणे राबत होते. या संशोधनातून एक नंबरसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेच नाव पुढे आले. याशिवाय कोलंबिया विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. त्यावर ‘सिम्बॉल आॅफ नॉलेज’ असा उल्लेख करण्यात आला आहे,’ अशी माहिती अरुण जावळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.