डॉ. आंबेडकरांचा शैक्षणिक वारसा जपूया : जावळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:38 AM2021-04-15T04:38:24+5:302021-04-15T04:38:24+5:30
सातारा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपाने एक प्रेरणादायी आदर्श जगासमोर उभा आहे. कॅनडातील ब्रिटिश कोलंबियाने डॉ. आंबेडकरांना 'समतेचे ...
सातारा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपाने एक प्रेरणादायी आदर्श जगासमोर उभा आहे. कॅनडातील ब्रिटिश कोलंबियाने डॉ. आंबेडकरांना 'समतेचे जागतिक प्रतीक' असा बहुमान घोषित करून डॉ. आंबेडकरांचा जन्मदिन हा समतादिन म्हणून साजरा करण्याचा नुकताच निर्णय केला. ही गोष्ट भारतासाठी गौरवपूर्ण असून, आज डॉ. आंबेडकरांच्या कार्यकर्तृत्वानं अवघं जग अचंबित होताना दिसते आहे. अशा या महामानवाचा साताऱ्याला शैक्षणिक वारसा लाभला आहे. तो जपणं आणि चिरंतन तेवत ठेवणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन साहित्यिक अरुण जावळे यांनी केले.
ज्या शाळेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेतला, त्या छत्रपती प्रतापसिंह हायस्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३० वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंती कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून अरुण जावळे बोलत होते. अध्यक्षस्थानी हायस्कूलचे मुख्याध्यापक सन्मती देशमाने होते.
अरुण जावळे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे व्यक्तिमत्त्व विद्यार्थ्यांच्यामध्ये आपल्याला घेऊन जायला हवे. त्यांचा संघर्ष, त्यांचा शैक्षणिक प्रवास हा विद्यार्थ्यांची ऊर्जा आणि प्रेरणा बनायला हवा, तरच डॉ. आंबेडकराच्या स्वप्नातील विद्यार्थी घडू शकतील आणि मग राष्ट्रही आपोआप घडू शकेल. त्यामुळे मजबूत विद्यार्थी घडविण्याचं कार्य आपण सुरू ठेवूया. आंबेडकरांचा विचारवारसा जर आपल्याला जपायचा असेल, हे राष्ट्र सक्षम - समृद्ध बनवायचे असेल, तर नव्या पिढीकडे अधिक गांभीर्याने आणि जबाबदारीने आपण पाहायला हवे. कारण नवी पिढी हीच उद्याचा नवा भारत असणार आहे.
मुख्याध्यापक सन्मती देशमाने म्हणाले, ज्या हायस्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिकले, ते हायस्कूल चालविण्याचं भाग्य आम्हाला मिळतंय ही आमच्यासाठी खूपच आनंदाची गोष्ट आहे. या हायस्कूलला लाभलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा हा निश्चितपणे अधिक सक्षमपणे जपण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावर हे हायस्कूल कसे पोहोचेल असा प्रयत्न आम्ही करणार आहोत. हा प्रयत्न यशस्वी करणं हीच एका अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली असणार आहे. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे समन्वयक राजेंद्र कांबळे यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतील योगदानावर भाष्य केले. छ. प्रतापसिंह हायस्कूलमधील शिक्षक महेंद्र एकळ यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. महेश घाडगे यांनी आभार मानले. यावेळी पूनम महाजन, सतीश गोफणे, उत्तम साळुंखे, अर्चना पंडत, विशाल अडसूळ, आदी शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.