मायणीचे प्राध्यापक देणार आर्यलॅंडमध्ये मेडिकलचे धडे!
By प्रगती पाटील | Published: June 11, 2024 08:08 PM2024-06-11T20:08:25+5:302024-06-11T20:08:40+5:30
डॉ. नानासाहेब थोरात यांना बहुमान; प्रख्यात रॉयल मेडिकल विद्यापीठात प्रोफेसरपदी निवड
सातारा : ज्या विद्यापीठाची फेलोशिप मिळविण्यासाठी आणि एकदा तरी तेथील वैद्यकीय शिक्षणाचा अनुभव घेण्यासाठी हजारो डॉक्टर जीवाचे रान करतात अशा प्रख्यात विद्यापीठात अध्यापनासाठी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि मुलखतीद्वारे अनेक देशांतील शंभरहून अधिक जागतिक शास्त्रज्ञांमधून मायणी येथील डाॅ. नानासाहेब थोरात यांची सहयोगी प्राध्यापक पदी निवड करण्यात आली आहे. सप्टेंबरपासून डॉ. थोरात रॉयल कॉलेजमध्ये फिजिओलॉजी मेडिकल फिजिक्स आणि मेडिसिन विभागामध्ये एमबीबीएस आणि एमडीच्या विद्यार्थ्यांना न्यूरोसायन्स आणि ब्रेन कॅन्सर या विषयाचे अध्यापन करणार आहेत.
आयर्लंड येथील तीनशे वर्षे जुन्या रॉयल कॉलेज ऑफ सर्जन या मेडिकल विद्यापीठात तीनशे वर्षे जुने असून इथे जगातील शंभर देशातून तीन हजार डॉक्टर्स दरवर्षी शिक्षण घेतात. आंतरराष्ट्रीय पीएचडी प्रोग्रॅम अंतर्गत लहान मुलांमधील ब्रेन कॅन्सर, स्त्रियांमधील ब्रेस्ट आणि ब्रेन कॅन्सरवरती संशोधन करणाऱ्या चार पीएचडी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक म्हणून डाॅ. थोरात जबाबदारी पार पाडणार आहेत. विद्यापीठात फक्त दोनच भारतीय प्राध्यापक आहेत. तीनशे वर्षाच्या विद्यापीठाच्या इतिहासात डॉ. थोरात यांच्या रूपाने पहिल्यांदाच एका मराठी व्यक्तीला तेथे प्रोफेसर पदाची संधी मिळाली आहे. दरम्यान, नुकतेच आयरिश रिसर्च कौन्सिल या गव्हर्मेंट ऑफ आयर्लंडच्या संस्थेकडून डॉ. थोरात यांच्या कॅन्सरवरील संशोधन प्रकल्पासाठी १.१५ लाख युरोंचा (एक कोटी रुपये) संशोधन निधी मिळाला आहे. डॉ. नानासाहेब थोरात हे सातारा जिल्ह्यातील मायणी या गावचे असून त्यांचे शालेय शिक्षण मायणीमध्ये, महाविद्यालयीन शिक्षण विटा तर पदव्यूत्तर आणि पीचडी पर्यंतचे शिक्षण कोल्हापूर मध्ये झाले आहे. फिजिक्स विषयात शिवाजी विद्यापीठातून एमएससी तर डी वाय पाटील विद्यापीठ कोल्हापूर मधून पीएचडी केली आहे.
१. आठ पुस्तके, तीन पेटंट आणि पंचवीस अध्याय
डॉ. थोरात हे सध्या आर्लंडमधील युनिव्हर्सिटी ऑफ लिम्रिक मध्ये भौतिकशास्त्र आणि लिमेरिक डिजिटल कॅन्सर रिसर्च सेंटर मध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ या पदावर कार्यरत आहेत. तेथे कॅन्सरवर संशोधनाचे कार्य करत आहेत. २०२० ते २०२२ पर्यंत ईंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठात वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत होते. सध्या ते ऑक्सफर्ड विद्यापीठच्या मेडिकल सायन्स डिव्हिजनचे सहयोगी शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. डॉ. थोरात यांचे सन २०१२ पासून कॅन्सरवर एकशे पंचवीसपेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय संशोधन पेपर, आठ आंतरराष्ट्रीय पुस्तके, तीन आंतरराष्ट्रीय पेटंट (इंव्हेशन्स) आणि पंचवीसपेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय पुस्तकामध्ये पुस्तक अध्याय प्रसिद्ध झाले आहेत.