दाभोलकरांच्या विचारांचा दहा राज्यांत जागर!, ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्कचा पुढाकार
By प्रगती पाटील | Published: August 20, 2022 04:23 PM2022-08-20T16:23:49+5:302022-08-20T16:24:25+5:30
अनिष्ठ प्रथा, परंपरा समाजाला पोखरण्याचे काम करत होते. नागरिकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन काही मंडळी समाजाला अंधश्रद्धेच्या खाईत वर्षांनुवर्षे लोटत होते. हीच अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून संस्थापक कार्यवाह दिवंगत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी हाती घेतले.
प्रगती जाधव-पाटील
सातारा : अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून समाजाला विवेकवादी विचारांची देणगी देणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या मृत्यूपश्चात त्यांचे हे विचार महाराष्ट्राबाहेरही रुजू लागले आहेत. विज्ञानाच्या प्रचार आणि प्रसाराचे काम करणाऱ्या सुमारे दहा राज्यांमधील संस्थांनी विज्ञान वादाबरोबरच अंधश्रद्धा निर्मूलनाचे कामही जोमाने सुरू केले आहे. दाभोलकरांची हत्या करून त्यांचे विचार संपविण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी विवेकवादींचे हे कृतिशील उत्तर आहे.
अनिष्ठ प्रथा, परंपरा समाजाला पोखरण्याचे काम करत होते. नागरिकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन काही मंडळी समाजाला अंधश्रद्धेच्या खाईत वर्षांनुवर्षे लोटत होते. हीच अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून संस्थापक कार्यवाह दिवंगत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी हाती घेतले. तरुण पिढीला वैज्ञानिक दृष्टिकोन देत असताना प्रत्येक कृतीला, घटनेला विज्ञानाची जोड देणे, ती विज्ञानाच्या फुटपट्टीने तोलण्याची शिकवण दिली. ही चळवळ हळूहळू राज्यभर पसरली.
दाभोलकरांच्या हत्येला नऊ वर्षे झाली; दाभोलकरी विचार संपवू शकले नाहीत. समाजातील तरुणाई त्यांच्या विचाराने दिवसेंदिवस प्रेरित होत आहे. आता त्यांच्या विचारांचा जागर दहा राज्यांमध्ये सुरू आहे, हे निश्चित समाजाला दिशादर्शक आहे.
डॉ. दाभोलकरांच्या साहित्याचे स्थानिक भाषेत भाषांतर..
अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम सुरू केल्यानंतर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी ‘ठरलं डोळस व्हायचं’, ‘प्रश्न तुमचा उत्तर दाभोलकरांचे’, ‘लढे अंधश्रद्धेचे, ‘श्रद्धा-अंधश्रद्धा’, ‘तीमिरातूनही तेजाकडे’, ‘अंधश्रद्धा प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम’, ‘भ्रम आणि निरास’, ‘विचार तर कराल?,’ या पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. या पुस्तकांतील काही अंशांचे स्थानिक भाषेत भाषांतर करून त्याचे वितरण करण्यात आले.
यामुळे दाभोलकर भावले..!
विज्ञान प्रसाराचे काम करणाऱ्या मंडळींना डॉ. दाभोलकर यांचे काम ज्ञात होते; पण त्यांच्या हत्येनंतर त्यांनी केलेल्या कामाची व्याप्ती आणि समाजाच्या निच्चतम स्तरापर्यंत रुजलेली अंधश्रद्धेची खोली लक्षात आली. विज्ञानाचा प्रसार करण्याबरोबरच अंधश्रद्धा निर्मूलन केल्याने पुढे पिढ्यानपिढ्या होणारी जागृती महत्त्वाची असल्याचे या मंडळींचे मत झाले.
तर्कशुद्ध विचार मांडण्याचा अनोखा पायंडा...
धर्माच्या नावाखाली सुरू असलेल्या अंधश्रद्धेवर घाला घालताना डॉ. दाभोलकर यांनी कायम कायद्याचा आणि संविधानाचा आधार घेत लोकांच्या मनातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी त्यांच्या समोर विज्ञानाचे प्रयोग केले. ‘चमत्कार दाखवा आणि पाच लाख जिंका’ त्यांची ही योजना तर अनेकांवर भारी पडली. अन्य राज्यांत दाभोलकर विचारांचा विस्तार होण्यामागेही काही कारणे मानली जातात.
या राज्यांत सुरू आहे, दाभोलकर विचारांचे जागर
झारखंड, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, पंजाब-हरयाणा, केरळ, दिल्ली, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, अरुणाचल प्रदेश
आपल्याकडे अनेकदा धर्माच्या मुळाशी अंधश्रद्धा नांदते. लोकांच्या श्रद्धेला धक्का न लावता अंधश्रद्धेचे समूळ उच्चाटन करण्याची अनोखी पद्धत डॉ. दाभोलकरांची होती. नागपूरच्या कार्यक्रमात त्यांचे पहिले व्याख्यान ऐकण्याची संधी मिळाली. यातून ऊर्जा मिळाली आणि असेच काम करण्याचे धडेही घेतले. त्यांच्या हत्येनंतर ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्कच्या माध्यमातून आम्ही देशभरात त्यांच्या विवेकी विचारांचा जागर करू लागलो. -डी. एन. एस आनंद, झारखंड