दारूपुढे गावदर‘बार’ तोकडा!
By admin | Published: January 30, 2015 10:13 PM2015-01-30T22:13:19+5:302015-01-30T22:18:59+5:30
परवानगीची गरज नाही : ‘राज्य उत्पादन शुक्ल’च्या परिपत्रकाने उंचावल्या भुवया
भुर्इंज : पाचवड, ता. वाई येथे ग्रामपंचायतीची परवानगी न घेताच बिअरबार सुरू करण्यात आला. याबाबत जिल्ह्यात याची चर्चा होत असतानाच कोणत्याही ठिकाणी बिअर बार सुरू करावयाचा असेल तर त्याला ग्रामपंचायत परवानगीची गरजच नाही, असा स्पष्ट खुलासा राज्य उत्पादन शुल्कच्या परिपत्रकातील नियमावलीतून समोर आल्याने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.पाचवड येथे ग्रामपंचायतीची परवानगी न घेताच बिअर बार सुरू करण्यात आला. यावरून दि. २६ रोजी झालेल्या ग्रामसभेत गदारोळ झाला. या सर्व प्रकरणात ग्रामपंचातीच्या पदाधिकाऱ्यांवर काही ग्रामस्थांनी संशयाची सुई फिरविली. मात्र, याबाबत बिअर बार परवानगीचे परिपत्रक पाहिले असता त्यामध्ये ग्रामपंचायत परवानगीचा उल्लेखच नाही.
उत्पादन शुल्क विभागाने मारलेल्या याच ग्यानबाच्या मेखीचा फायदा घेऊन पाचवड गावच्या हद्दीत बिअर बार सुरू करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असले तरी या प्रकारावरून ग्रामपंचायतीच्या अधिकाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून बारला परवानगीची गरज नसेल तर इतर व्यवसायांना तरी ग्रामपंचायतीची परवानगी कशासाठी, असा प्रश्न उपस्थित करून हा प्रकार म्हणजे ग्रामपंचायत अधिकारांवर घाला असल्याचा आरोप केला जात आहे. एकीकडे केंद्र व राज्य शासनाकडून ग्रामपंचायतींना अधिकाधिक अधिकार दिले जात असताना दुसरीकडे मात्र राज्य उत्पादन शुल्क ग्रामपंचायतीचे अस्तित्वच नाकारणार असेल तर गावापेक्षा बिअर बार मोठा आहे काय, असा संतप्त सवाल ग्रामस्थांतून उपस्थित केला जात आहे. (प्रतिनिधी)
इतर व्यवसायांना परवानगी कशी?
सातारा जिल्ह्यात दारुबंदीची चळवळ आक्रमक असल्याने पूरक बाब म्हणून अशी परवानगी मागितली जात असली तरी ती अत्यावश्यक नाही. त्यामुळे बारसाठी जर ग्रामपंचायतीच्या परवानगीची गरज नसेल, तर इतर व्यवसायांसाठी तरी कशासाठी हवी? असा सवाल पाचवड ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांमधून होत असून उत्पादन शुल्कच्या या अजब कारभाराबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
ग्रामपंचायतीच्या अधिकारावर घाला कशासाठी?
पाचवड गावच्या हद्दीत जो बार सुरू झाला आहे त्याला ग्रामपंचायतीची कसलीही परवानगी नाही. हा बार सुरू होताच आम्ही आक्षेप नोंदविला आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी, राज्य उत्पादन शुल्क, तहसीलदार आदी ठिकाणी लेखी तक्रारी नोंदविल्या आहेत. मात्र एकाही ठिकाणी आमची नोंद घेतली नाही. बारला ग्रामपंचातीच्या परवानगीची गरज नसेल तर इतर व्यवसायांनाही तशी परवानगी घेण्याची गरज नाही, असे समजण्यास जनता कचरणार नाही. असे झाले तर ग्रामपंचातीच्या अस्तित्वाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होईल. हा ग्रामपंचायत अधिकारांवर घाला असून सगळा प्रकार संतापजनक आहे, अशी प्रतिक्रिया सदस्य महेश गायकवाड व भरत गायकवाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.