सापाची ‘क्रेझ’; पण विषाची परीक्षा!

By admin | Published: September 22, 2015 08:28 PM2015-09-22T20:28:47+5:302015-09-22T23:53:41+5:30

‘फोटोसेशन‘साठी होतेय ‘स्टंटबाजी’ : सर्पमित्रांचा ‘रोड शो’ ठरतोय जिवघेणा; साप खेळविण्यावर अनेकांचा भर--लोकमत विशेष

Dragons 'craze'; But the test of the test! | सापाची ‘क्रेझ’; पण विषाची परीक्षा!

सापाची ‘क्रेझ’; पण विषाची परीक्षा!

Next

संजय पाटील -कऱ्हाड  -‘स्टंटबाजी’ करायची तर जिवाचा धोका पत्करावाच लागतो; पण सध्या जिवावर उदार होऊन विषाची परीक्षा घेण्याचे अघोरी धाडस काहीजण दाखवतायत. साप पकडून तो सुरक्षित ठिकाणी सोडून देणे, हे सर्पमित्रांचे काम. मात्र, स्टंटबाजीसाठी सापासारखे जिवंत साधनच हाती लागत असल्याने काहीजण सापाचाच ‘रोड शो’ करीत असल्याचे उघडकीस येत आहे. ही ‘स्टंटबाजी’ त्या सर्पमित्रासह सर्पाच्याही जिवावर बेतणारी आहे. तसेच त्यातून कायद्याचंही श्राद्ध घातलं जातंय, ते वेगळंच. कऱ्हाडात गणरायासमोर सापाचा खेळ दाखविणाऱ्या पाचजणांना वनविभागाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून नाग, घोणस व धामण यासारखे सर्पही हस्तगत करण्यात आले आहेत. वनविभागाच्या या कारवाईमुळे ‘विषाची परीक्षा’ घेणाऱ्यांना चाप लागणार असला तरी सर्पांशी सुरू असलेला खेळ पूर्णपणे थांबणार का, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहे. मुळात सापाला शेतकऱ्यांचा मित्र म्हटले जाते. मात्र, हा मित्र दिसला तरी अनेकांची पाचावर धारण बसते. काहीजण त्याला मारायला तर काहीजण हुसकवायला धावतात. त्यातून एखाद्याला दंश झालाच तर भीती आणखी वाढते, त्यामुळे शहरी भागात बऱ्याचवेळा साप दिसला की सर्पमित्राला बोलविले जाते. सर्पमित्र त्याठिकाणी येऊन तो साप पकडतात. सुरक्षित ठिकाणी सोडण्यासाठी त्याला तेथून घेऊन जातात. सर्पांना जीवदान देण्याचे सर्पमित्रांचे काम निश्चितच चांगले आहे. मात्र, जीवदान देण्याच्या नावाखाली ‘स्टंटबाजी’ करण्याचे ‘फॅड’ दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसते. एका शहरात सध्या शेकडो सर्पमित्र म्हणून वावरताना दिसतात. सर्पमित्र होण्यासाठी कोणाच्याही परवानगीची किंवा विशेष प्रशिक्षणाची गरज भासत नाही. साप पकडण्याचे धाडस व तो हाताळण्याचे कमी-अधिक कौशल्य असेल तर लगेच सर्पमित्र म्हणून वावरता येतं, हे अनेकांना माहिती आहे, त्यामुळे एकाकडून दुसऱ्याने व दुसऱ्याकडून तिसऱ्याने साप हाताळण्याचे कौशल्य अवगत करून घेतले आहे. हे कौशल्य पदरी पडताच असे सर्पमित्र साप पकडायला धावतात. शास्त्रोक्त प्रशिक्षण नसल्याने ते त्यांच्या सोयीनुसार सापाला पकडण्याचा व हाताळण्याचा प्रयत्न करतात. त्यातून त्या सर्पमित्राच्या तसेच सापाच्याही जिवाला धोका निर्माण होतो, तसेच साप पकडल्यानंतर त्याचा ‘रोड शो’ करण्याची आयती संधीही मिळते. त्यामुळे काही सर्पमित्र साप पकडल्यानंतर त्याच्याशी खेळ करण्यास सुरुवात करतात. त्यातून उपस्थितांना अचंबित करण्याचा व स्वत:ची ‘क्रेझ’ निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. अशातच बघ्यांपैकी एखाद्याच्या मोबाईलचा कॅमेरा सुरू झाला तर त्या सर्पमित्रातला ‘स्टंटमॅन’ जागा होतो. सापाला अक्षरश: तो अंगाखांद्यावर खेळवतो. ‘फोटोसेशन’साठीही तो हव्या तशा ‘पोझ’ देतो. त्यातून उपस्थितांचे मनोरंजन तर होतेच शिवाय त्या सर्पमित्राच्या धाडसाचेही कौतुक केले जाते. विषाची परीक्षा घेणारे सर्वच सर्पमित्र असे करीत नाही; पण जे करतात त्यांच्यावर वचक निर्माण करणे सध्या गरजेचे बनले आहे. साप पकडून ‘स्टंटबाजी’ करण्याबरोबरच साप पाळण्याचा उद्योगही काहीजण करीत असल्याचे कऱ्हाडातील कारवाईवरून स्पष्ट झाले आहे.

सापांचा ‘ड्राय बाईट’
सापांच्या जातीमध्ये हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच साप विषारी आहेत़ बहुतांश साप दंश करतात; पण त्यांचा दंश माणसासाठी जिवघेणा ठरू शकत नाही़ शास्त्रीय भाषेत त्या दंशाला ‘ड्राय बाईट’ असे म्हणतात़
१५० मिलीग्रॅमचा दंश
साप विनाकारण कधीही दंश करीत नाही़ त्याला डिवचले, मारण्याचा प्रयत्न केला किंवा साप कोंडीत सापडला तरच तो दंश करतो़ विषारी सापांची दंशावेळी विष सोडण्याची क्षमता कमी-जास्त असली तरी साधारणपणे एका दंशावेळी साप १५० मिलीग्रॅम विष सोडतो़
मण्याराचा दंश सर्वात घातक
सापाचे १५ ते २० मिलीग्रॅम विषही माणसासाठी प्राणघातक ठरू शकते़ मण्यार जातीच्या सर्पाचा दंश झाल्यानंतर त्वरित उपचार न झाल्यास दोन तासांत रूग्ण दगावू शकतो़ बिनविषारी सर्पाचा दंश झाला तरी कालांतराने जखम बळावण्याची व धनुर्वातासारख्या आजराची लागण होण्याची शक्यता असते़ त्यामुळे जखमेवर उपचार करणे गरजेचे असते़
विषारी, बिनविषारी साप
जिल्ह्यात आढळणारे धामण, दिवंड, पाणदिवंड, गवत्या, शेवाळी, कुकरी, तस्कर, कवड्या, उडता सोनसर्प, मांडूळ, डुरक्या हे साप बिनविषारी आहेत, तर काळा नाग, एकाक्ष नाग, चष्मा नाग, मण्यार, घोणस, पोवळा हे विषारी आहेत़

Web Title: Dragons 'craze'; But the test of the test!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.