चाफळ विभागाला कोरोनाचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:27 AM2021-07-15T04:27:08+5:302021-07-15T04:27:08+5:30
चाफळ : पाटण तालुक्याच्या चाफळ विभागात कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली आहे. माजगावपाठोपाठ चाफळ व बाटेवाडी येथे बाधित आढळून आल्याने ...
चाफळ : पाटण तालुक्याच्या चाफळ विभागात कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली आहे. माजगावपाठोपाठ चाफळ व बाटेवाडी येथे बाधित आढळून आल्याने चिंता वाढली आहे. कोरोनाचा हॉटस्पॉट ठरू पाहत असलेल्या चाफळ विभागात मंगळवारी चाफळ येथे दोन व बाटेवाडी येथील एक महिला बाधित आढळून आली. सध्या विभागात बाधितांचा आकडा २९ वर जाऊन पोहोचला आहे. तर माजगाव येथील नऊ बाधितांनी कोरोनावर मात केल्याने थोडा दिलासा मिळाला आहे.
गत पंधरवड्यात माजगाव येथे अनेक ग्रामस्थांना सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवू लागल्याने चाफळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन कुराडे यांनी त्यांच्या आरटीपीसीआर चाचण्या करून घेतल्या. यात एकाचवेळी नऊ जण बाधित आढळून आले होते. त्यानंतर रुग्णसंख्या वाढून माजगावच्या बाधितांचा आकडा २६ वर जाऊन पोहोचला. यातील नऊ बाधितांनी कोरोनावर मात केल्याने माजगावला काही प्रमाणात दिलासा मिळाला. दरम्यान, मंगळवारी अहवालात चाफळ येथील २ व बाटेवाडी येथील १ महिला असे ३ जण बाधित आढळून आल्याने चिंता वाढली आहे.
माजगाव ग्रामपंचायतीने त्वरित उपाययोजना राबविल्याने येथे रुग्णसंख्या घटू लागली आहे. तर चाफळ, बाटेवाडीत नव्याने बाधित आढळू लागल्याने चिंता वाढू लागली आहे. ग्रामस्तरीय कोरोना समित्यांनी गावस्तरावर दक्षता पाळून शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे बनले आहे. सध्या विभागात २० बाधित रुग्ण उपचार घेत आहेत.